जिल्ह्याच्या विकास आराखड्याचे प्रधान सचिव नियोजन यांनी केले कौतुक
जिल्ह्याचा विकास आराखडा उत्कृष्ट झाल्याची ग्वाही
भंडारा, दि.9 : भंडारा जिल्ह्याने बनवलेला जिल्हा विकास आराखडा हा उत्कृष्ट असून यामध्ये जिल्ह्याच्या विकासाबाबत उत्तम नियोजन झाले असल्याचे उदगार प्रधान सचिव नियोजन विभाग सौरभ विजय यांनी काल झालेल्या राज्यस्तरीय नियोजन विभागाच्या बैठकीत काढले.
जिल्हा विकास आराखड्यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांनी केलेल्या सूक्ष्म नियोजन व अभ्यासाची पावती कालच्या ऑनलाइन बैठकीत प्रधान सचिवांनी दिली .
काय आहे जिल्हा विकास आराखडा?
भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासासाठी 2022 पासून 2028 पर्यंत दरडोई उत्पन्नात 2.5 पट वाढ आणि जिडीपीमध्ये किमान 18% वार्षिक वृद्धी दरक गाठण्याचे उद्दिष्ट भंडारा समोर ठेऊन, भंडारा जिल्ह्याचा ‘जिल्हा विकास आराखडा’ बनविण्यात आला आहे.
ही उद्दिष्ट गाठण्यासाठी पिके, पशुधन, मत्स्यपालन, वने आणि पर्यटन, उत्पादन प्रक्रिया, अक्षय ऊर्जा हि प्राधान्य क्षेत्रे म्हणून अंतिम करण्यात आली आहेत. प्रत्येक क्षेत्राचे स्वॉट (SWOT) विश्लेषण करण्यात आले, त्यांच्या मागील ७ वर्षातील कामगिरीचा BCG मॅट्रिक्स च्या माध्यमातून आढावा घेण्यात आला व त्यानुसार पुढील ५ वर्षाचा कृती आराखडा बनविण्यात आला आहे.
या कृती आराखड्यामध्ये पीक विविधीकरण करणे, कृषी यांत्रिकीकरण, साठवणूक क्षमता आणि शीतगृहे वाढविणे, एमपेडा सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे, पितळ आणि टसर उद्योगाला चालना देणे, इको टुरिझम च्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रावर भर देणे इत्यादी गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत मा जिल्हाधिकारी यांनी दिनांक १७/१२/२०२३ रोजी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादरीकरण केले.
हा आराखडा बनविताना विविध क्षेत्रातील तज्ञ भागधारकांची मते जाणून घेण्यासाठी 19 बैठका घेण्यात आल्या. नागपूरचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, पुण्याचे सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांसारख्या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांची मदत घेण्यात आली. याशिवाय, सदर आराखड्यासाठी नागरिकांना आपल्या सूचना पाठविण्याचे आवाहन प्रशासनाने 4 मे 2023 रोजी वृत्तपत्रांतून केले होते, त्यानुसार प्रशासनाला 70 हून अधिक सूचना प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, मुख्यमंत्री फेलो निलेश साळुंके व सिकॉम कन्सल्टन्ट राहुल पंचभाई यांनी सर्व विभागांशी समन्वय साधून हा आराखडा बनविण्यासाठी विशेष मेहनत घेतली.