गडचिरोली जिल्ह्याची दारुबंदी उठविली जाणार नाही -देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्ह्याची दारुबंदी उठविली जाणार नाही – देवेंद्र फडणवीस

जिल्हा दारुमुक्ती संघटनेच्या प्रतिनिधींना ग्वाही

नागपूर ,दि.6 : गडचिरोली जिल्हा दारुमुक्ती संघटनेच्या वतीने जेष्ठ समाजसेवक पद्श्री डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने मोहफुलापासुन दारु निर्मितीचा कारखाना होणार नाही, असे आश्वासन दिल्याबद्दल आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गडचिरोली जिल्ह्याची दारुबंदी उठविल्या जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिली.
यावेळी जेष्ठ समाजसेवक पद्श्री डॉ.अभय बंग, मेंढा येथील ग्राम स्वराज्याचे प्रमुख आदिवासी नेते देवाजी तोफा, माजी आमदार हिरामण वरखेडे, कुरखेडा येथील शुभदा देशमुख, डॉ.सतीश गुगलवार, वडसा येथील सुर्यप्रकाश गभणे, मुक्तीपदचे संतोष सावळकर, विजय वरखडे, सुबोध दादा तसेच बारा तालुक्यातील दारुमुक्ती संदर्भातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात ३० वर्षापासून दारुबंदी आहे. राज्य टास्क्‍ फोर्स अंतर्गत दारु व तंबाखू मुक्तीसाठी ‘मुक्तीपथ’ हा जिल्हाव्यापी प्रकल्प सुरु झाला आहे. याअंतर्गत दारु व तंबाखू बंदीचे प्रमाण बरेच कमी झाले आहेत. या कारखान्याचा आदेश रद्द करावा यासाठी जिल्ह्यातील 842 गाव, 12 शहरातील 117 वार्ड, 10 आदिवासी इलाका सभा व तालुका महासंघ तसेच 53 महाविद्यालयातील युवा अशा एकूण 57 हजार 896 नागरिकांच्या सह्या असलेले 1 हजार 31 प्रस्ताव या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी संजय मीना उपस्थित होते. जिल्हा दारुमुक्ती संघटनेच्या वतीने डॉ.अभय बंग, उपाध्यक्ष देवाजी तोफा यांनी दारुबंदी संदर्भात मागण्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.