महाराष्ट्र बहुभाषीय पत्रकार परिषदेच्या वतीने मराठी “पत्रकार दिन” संपन्न / लघुसंवर्गातील वृत्तपत्रांच्या समस्यांबाबत आंदोलनाच्या माध्यमातून धरणा देत प्रशासनास दिले निवेदन

महाराष्ट्र बहुभाषीय पत्रकार परिषदेच्या वतीने मराठी “पत्रकार दिन” संपन्न
लघुसंवर्गातील वृत्तपत्रांच्या समस्यांबाबत आंदोलनाच्या माध्यमातून धरणा देत प्रशासनास दिले निवेदन
६ जानेवारी मराठी पत्रकार सृष्टीचे जनक ‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून लघु वृत्तपत्रांच्या समस्यांबाबत व शासनाकडून लघु वृत्तपत्रे कायमस्वरूपी समाप्त करण्यासाठी आखलेले धोरण तसेच साखळी वृत्तपत्रे, मोठ्या उद्योजकांची वर्तमानपत्रे अबाधित ठेवण्याकरिता व प्रिंट मीडियाला आपल्या नियंत्रणात करण्याकरिता दोषपूर्ण कायदे, अन्यायकारक धोरण आखून विशेषतः २०१८ चे शासन निर्णय ठरवताना त्यात जिल्हा वृत्तपत्रांचे कोणतेही अभ्यासक प्रतिनिधी न घेता आपल्या सोयीनुरूप महाभागांना सामावून घेत तसेच माहिती व जनसंपर्क खात्यातील तत्कालीन महासंचालकांपासून, संचालक, उपसंचालक, सहसंचालक व काही जिल्हाधिकाऱ्यांना व सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना सोयीनुरूप हा सिद्धांतिक नियम व निकष लादण्याचा प्रकार तसेच वर्गीकृत, दर्शनी जाहिराती वितरणात जिल्हा वृत्तपत्रांच्या जाहिरात आकारमान फारच कमी करून केलेले षडयंत्र पाहता महाराष्ट्रातील सर्व जिल्हा वृत्तपत्रांच्या न्यायसंगत बाबींवर चर्चा न करता चाललेल्या षडयंत्राच्या निषेध म्हणून आज दिनांक ६/०१/२०२४ रोजी जिल्हा कचेरी समोर मराठी पत्रकार दिनी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये आंदोलन पुकारून जिल्हा लघुवृत्तपत्रांच्या विविध क्षेत्रांचे 21 प्रश्न व मागण्या जिल्हा प्रशासनाकडून ५ पानांचे निवेदन जिल्हा प्रशासनातील अधिकारी मान. श्री. राजेश येसनकरजी जिल्हा माहिती अधिकारी यांना देण्यात आले. एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वर्तमान जिल्हा माहिती अधिकारी श्री. राजेश येसनकरजी यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ शासनाकडे सकारात्मक बाजू मांडण्याचे व याबाबत शासनाकडे पत्रकारांच्या वतीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
चंद्रपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन  शासनास २६ जानेवारी पूर्वी दखल न घेतल्यास पत्रकारांनी २६ जानेवारी रोजी गंभीर पाऊल उचलण्याचा इशारा दिला असून विशेषतः प्रसिद्ध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व योग्य त्या यंत्रणेचा अभाव पाहता तात्काळ व्यवस्था करण्यात यावी जिल्हा वृत्तपत्रांना दर्शनी व वर्गीकृत जाहिरात देताना त्याचे दर व आकारमान तसेच वितरण प्रमाण यात तात्काळ वृद्धी करण्यात यावे तसेच जिल्हा वृत्तपत्रांच्या अधिस्वीकृतीचा प्रश्न सुद्धा निवेदनात नमूद केल्याप्रमाणे तात्काळ सोडविण्यात यावा. विशेषता जिल्हा माहिती कार्यालयातील बहुतांश अधिकाऱ्यांनी जिल्हा वृत्तपत्रांच्या संपादकांशी कोणताही आकस न ठेवता, राजकीय दबावाचा वापर न करता व दबावाला बळी न पडता राष्ट्राच्या जडणघडणीत लघुसंवर्गातील वृत्तपत्रांची स्वातंत्र्यपूर्वीपासून आजतागायत असलेली भूमिका लक्षात घेता सहकार्य करावे. तसेच त्वरित २०१८ चे धोरण दुरुस्तीबाबत नागपूर येथे संघटनेसोबत महासंचालकांची बैठक लावून तत्वताच मुख्यमंत्र्यांशीही अंतिम चर्चा ३१ मार्चपूर्वी करून जिल्हा वृत्तपत्रांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवावे. जेणेकरून जिल्हा वृत्तपत्रांना, महाराष्ट्राच्या गौरवशाली पत्रकारितेच्या परंपरेला हानी पोहोचणार नाही. याची गांभीर्याने दखल न घेतल्यास २०२४ च्या निवडणुकीत जिल्हा वृत्तपत्रांनाही सर्व बाबी विसरून याकरिता शासनाने वेळेवर निर्णय न घेतल्यास लघुसंवर्गातील वृत्तपत्रे अबाधित राखण्याकरिता महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्राच्या संत परंपरेला अभिवादन करून अन्याय करणाऱ्या सरकार विरोधात आपला निषेध व्यक्त करण्याकरिता नाईलाजास्त पाऊल उचलावा लागेल. अशी भावना परिषदेचे प्रांताध्यक्ष सरदार हरविंदरसिंह धून्नाजी यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाप्रसंगी संपादकांच्या भरगच्च उपस्थितीत मान. यशवंत दाचेवारजी, मान.किशोर पोतनवारजी, मान. चंद्रगुप्त रायपुरेजी, मान. पुरुषोत्तम चौधरीजी, मान. राजेश सोलापनजी मान. आयुब कच्छीजी इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले. यात विशेषतः श्री. प्रभाकर आवारी, श्री. जसबीरसिंग वधावन, श्री. अन्वर मिर्झाजी, श्री. अशोक कोटकरजी, योद्धाज ग्रुप चे अध्यक्ष श्री. पंकज गुप्ताजी, श्री. पेटकरजी, डॉ. प्रा.आरती दाचेवार, श्री. योगेश उपरे, श्री. विनोद दुर्गे, श्री. दीपक खाडीलकरजी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत व पोलीस प्रशासनाच्या चौख बंदोबस्तात सांगोपांग चर्चा करून शासनास ५ पानांचे निवेदन जिल्हा माहिती अधिकारी यांचे मार्फत सादर करण्यात आले असून संपूर्ण मंत्रिमंडळालाही रवाना करण्यात आले आहे.
शेवटी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना परिषदेतर्फे श्रद्धा सुमन अर्पित करून डॉ. आरती दाचेवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
 लघु वृत्तपत्रांना जागृत पाठक मंचाचा पाठिंबा:
 वृत्तपत्रांचे वाचन व त्यातील प्रकाशित बातम्या, समस्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणारे मंच “जागृत पाठक मंच” च्या महिला शाखेच्या सौ. मंगला भुसारी यांच्या नेतृत्वात ११ महिलांच्या शिष्टमंडळांनी प्रत्यक्ष येऊन लघु वृत्तपत्रांना पाठिंबा देत, शासनास जिल्हा वृत्तपत्रांच्या समस्यांची तात्काळ दखल घेण्याची निवेदन प्रेषित केले आहे.