शेतकरीपुत्राचे मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र!
आमचा शेतकरी बाप रात्रं-दिवस शेतात राबतो. दिवसा वीज नसल्याने रात्री साप, विंचूंना न घाबरता पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर शेतात जागतो. इतके करूनही अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. कापूस, सोयाबीनचा बाजारातील भाव कोसळले. आर्थिक अडचण वाढल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही.
ही व्यथा आहे यवतमाळ जिल्ह्याच्या वाईरूई येथील कुणाल जतकर या शेतकरी पुत्राची. आपल्या व्यथेची जाणीव मुख्यमंत्र्यांना व्हावी म्हणून चक्क रक्ताने याने पत्र लिहिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवणही पत्रातून काढून दिली आहे.
आज शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. घरातील वृद्ध आईवडिलांच्या औषधीचा खर्च करू शकत नाही. मुला-मुलींचे लग्न करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नाही. नैराश्य वाढू लागले आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणीही कुणालने आपल्या रक्तपत्रातून केली आहे…. सत्ताधारी आमदारांना कोटींचा निधी देणारे मुख्यमंत्री शेतकरी कुटुंबांची ही मागणी मान्य करतील का ?
पत्र, निवेदने, पानपत्र आणि आता रक्तपत्र लिहिल्यानंतर तरी या निगरगट्ट सरकार शेतकऱ्यांच्या व्यथा कळणार आहेत काय?