विशेष लेख नवमतदारांनो, मतदान प्रक्रीयेत सहभागी व्हा
निवडणुक विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हयात युवक नवमतदार 7087 तर 6994 युवती या नवमतदार आहेत.मात्र साधारण 1800 नवमतदारांनी अदयापही महाविदयालयीन स्तरावर मतदार नोंदणी केलेली नाही .त्यांनी नोंदणी करुन मतदान प्रक्रीयेत सहभागी होणे गरजेचे आहे.
|
यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. युवकांचा देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात युवकांनी सर्वच क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. युवा लोकसंख्येला लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क दिले आहेत. देशात प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी विकासाला अधिक चालना देण्याची गरज आहे.
लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर विकासाला चालना देता येते. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही लोकशाही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने दिलेल्या सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला वाढविण्यासाठी, त्यात आवश्यक बदल करण्यासाठी, तुमच्या विचारधारेचे राज्यकर्ते निर्माण होणे गरजेचे आहे.
मतदान प्रक्रिया ही मुळातच चांगले राज्यकर्ते निर्माण करणारी पवित्र प्रक्रिया आहे, आणि मतदान करणेसुद्धा देश सेवेचाच एक भाग आहे. मतदान करताना चिन्हाच्या मागील असलेल्या उमेदवाराला आपण मतदान करतो. चिन्हापेक्षा आपला चांगला उमेदवार निवडून आला पाहिजे ही मानसिकता आपण ठेवून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, मतदान केले नाही म्हणून ते निवडून येत नाहीत असे नाही.
उलट चुकीचा नेता निवडला जाण्याची शक्यता वाढते, प्रक्रियेच्या बाहेर राहून टीका करण्यापेक्षा, मतदान करून प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा, जर तुम्ही मतदानच केलं नाही तर तुम्हाला प्रश्न विचारण्याचाही अधिकार उरत नाही ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय योगदानात आपण कुठे आहोत याचा विचार करताना मतदान करणे हे सुद्धा राष्ट्रीय काम आहे याचा विचार व्हावा.
केंद्रीय निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार मागील वेळी 2019 च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात एकुण मतदार नोंदणी झालेल्या मतदारांपैकी फक्त 67 टक्के लोकांनी मतदान केले.
देशातील 91 कोटी मतदारांमधील 30 कोटींहून अधिक जणांनी मतदानाला प्रत्यक्ष पाठ फिरवली होती. महाराष्ट्रात 8.85 कोटी मतदारांपैकी 61 टक्के मतदारांनी मतदान केले होते, ही आकडेवारी देशाच्या व राज्याच्या तुलनेत जास्त असली तरी ती पुरेशी नाही. मतदानात सक्रीय सहभाग घेणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.ते आपण सगळयांनी बजावले पाहीजे.
भंडारा जिल्हयात 27 ऑक्टोबर रोजी प्रसीध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादी 31 डिसेंबर 2023नुसार एकुण 9 लक्ष 93 हजार 358 एकुण मतदार आहेत.तर त्यापैकी स्त्री मतदारांची संख्या 4 लाख 95 हजार 358 इतकी आहे.नवमतदार म्हणजे नवयुवक –युवतींनी मतदानात सहभागी व्हावे,यासाठी शिक्षण विभागामार्फत जाणीव –जागृती व प्रसार करण्यात येत आहे.मात्र त्याबाबत खुदद नवमतदारांनी ही काळजी घेणे,मतदान प्रक्रीयेत सहभागी होण्याची प्रक्रीया करणे हे कर्तव्य ठरते.
सुदृढ लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. देशाच्या भविष्याचा विचार करणारा, विकासाची दिशा ठरविणारा घटक म्हणून युवकांकडे पाहिले जाते, मग हेच युवक राष्ट्रीय कामाला प्राधान्य देत नसतील तर, जे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न कधी पूर्ण करणार? भारताची लोकशाही व्यवस्था ही जगातील मोठी लोकशाही आहे.
ही लोकशाही टिकविण्याची व अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी ही आजच्या तरुण पिढीवर आहे, पारदर्शक निवडणुका हा या लोकशाहीचा गाभा आहे. देशाच्या विकासात आजच्या युवकांच्या आपेक्षा, गरजा, त्यांच्या सक्षमतेला अपेक्षित व्यासपीठ, रोजगार संघी यांना जर योग्य स्थान द्यायचे असेल तर युवा मतदार जागृत असणे आवश्यक आहे.
कोणत्याही क्षेत्रात काळासोबत पाऊल टाकत परिवर्तन घडवायचे असेल तर युवकांचा सहभाग निर्णायक ठरतो. येणा-या सर्वच निवडणुकांमधे तरुणाईने मोठ्या संख्येने मतदान करणे आवश्यक आहे, नोंदणी प्रक्रियेतून आता युवा मतदारांचा टक्का वाढत आहे. आजची युवा पिढी ही भविष्याचा वेध घेत अभ्यास करते. त्यांना हव्या असलेल्या करिअरच्या वाटा, कौशल्ये याबाबत युवापिढीची मतंही ठरलेली आहेत.
मतदानात जर युवकांचा सहभाग वाढला तर त्यांना लोकशाहीची खरी ओळख होईल, युवक म्हणुन ज्या सामाजिक जवाबदाऱ्या व कर्तव्ये आहेत त्यांची जाण व भानही येईल, म्हणून मतदान या राष्ट्रीय कामाला युवकांसह सर्व वयोगटातील मतदारांनी प्राधान्य देणे गरजेचे वाटते.निवडणुक विभागाने दिलेल्या माहितीनुसार
युवक नवमतदार 7087 तर 6994 युवती या नवमतदार आहेत.मात्र साधारण 1800 नवमतदारांनी अदयापही महाविदयालयीनस्तरावर मतदार नोंदणी केलेली नाही .त्यांनी नोंदणी करुन मतदान प्रक्रीयेत सहभागी होणे गरजेचे आहे.
शैलजा वाघ-दांदळे,
जिल्हा माहिती अधिकारी,भंडारा