तालुकास्तरावर प्रथमच होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेला सुधीर मुनगंटीवार यांनी भव्यता आणली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Ø चंद्रपुरातून घडतील भविष्यातील ऑलिम्पिकपटू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ø चंद्रपूरचा डंका वाजत असल्याचा आनंद : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
Ø बल्लारपूर ( चंद्रपूर) येथे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
चंद्रपूर, दि. 28 : देशात कोणत्याही क्रीडा स्पर्धा तालुकास्तरावर होण्याचा हा पहिला प्रसंग आहे. परंतु राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आणि 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांना भव्यता प्राप्त झाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
बल्लारपूर येथील विसापूर तालुका क्रीडा संकुलात 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वने व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार रामदास आंबटकर, अप्पर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चावरे, पद्मश्री बहादूरसिंह चव्हाण, क्रीडापटू हिमा दास, ललिता बाबर, बॅडमिंटनपटू मालविका बनसोड, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे क्रीडा क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत. त्याचेच अनुकरण राज्य सरकार करीत आहे. कोणत्याही तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित होण्याचा हा पहिला प्रसंग आहे. या आयोजनला सुधीर मुनगंटीवार यांनी भव्यदिव्यता आणली. त्यामुळे चंद्रपुरातील भूमितून आगामी काळात ऑलिम्पिकपटू तयार झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. चांगल्या कामांबाबत सुधीर मुनगंटीवार नेहमीच आग्रही असतात, याचा आनंद वाटतो, असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणादरम्यान राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले. चंद्रपूर जिल्हा हा वाघ आणि साग यासाठी प्रसिद्ध आहे. या दोन्हीवर कोणत्याही प्रतिकूल वातावरणाचा परिणाम होत नाही. चंद्रपुरातील खेळाडूही तसेच कणखर आहेत. भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू ओलंपिक खेळण्यासाठी नक्कीच यशस्वी होतील अश्या शुभेच्छाही दिल्या.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनीही आपल्या भाषणात सुधीर मुनगंटीवार राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा बद्दल सुरुवातीपासून आग्रही होते, असे सांगितले. स्पर्धेचे आयोजन, सूक्ष्म नियोजन श्री. मुनगंटीवार यांनी स्वत: पुढाकार घेत केले. सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यही त्यांच्यामुळे वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने व आता क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने आपल्याला श्री. मुनगंटीवार किती सूक्ष्म नियोजन करतात हे बघायला मिळाले, असेही बनसोडे म्हणाले.
चंद्रपूरचा डंका वाजत असल्याचा आनंद : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशातील सर्वाधिक वाघ चंद्रपुरात आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दरवाज्याला वापरलेले सागवान लाकूडही चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. क्षेत्र कोणतेही असो चंद्रपूरचे नाव येतेच. त्यामुळे आगामी काळात ऑलम्पिक मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे नावलौकिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपुरात ‘मिनी भारत’चे दर्शन घडत आहे. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाचेही श्री. मुनगंटीवार यांनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात 2036 मध्ये होणाऱ्या ओलिम्पिक स्पर्धेत देशातील कोहिनुररूपी खेळाडू सर्वाधिक पदके प्राप्त करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, हरीश शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी महानगर अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी : स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर भव्यदिव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाने मान्यवर व उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. गायिका शाल्मली खोलगडे यांच्या ‘लाइव्ह परफॉर्मन्सने’ रंगत आणली. फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्स मुख्य आकर्षण ठरले.
अभूतपूर्व सोहळा : एक शाम खिलाडियो के नाम, शिववंदना, गणेश वंदन, महाराष्ट्राची लोकधारा, कलर्स ऑफ इंडिया आदी कार्यक्रमांच्या आयोजनाने स्पर्धा अभूतपूर्व ठरणार आहे. स्पर्धेचे प्रसिद्ध ‘थीम सॉंग’ ‘आओ चंद्रपूर खेलो चंद्रपूर’ला प्रसिद्ध पार्श्वगायक कैलास खेर यांचा आवाज आहे. प्रसिद्ध अभिनेते सलमान खान, आमिर खान यांनीही सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
खेळाडूंचा फ्लॅगमार्च : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी बल्लारपूर येथे दाखल झालेल्या सर्व राज्यातील खेळाडूंनी शिस्तबद्ध पध्दतीने फ्लॅगमार्च करीत आपापल्या राज्याचे दर्शन घडविले. या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून जवळपास 1 हजार 600 खेळाडू चंद्रपुरात दाखल झाले आहेत.
गॅझेटिअर व ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’चे प्रकाशन : मराठी भाषेत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या ‘गॅझेटिअरचे’ तसेच येथे आलेल्या खेळाडूंना चंद्रपूर जिल्ह्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाची माहिती व्हावी, या उद्देशाने हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ या माहिती पुस्तिके प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.