शहरातील नगरपंचायत येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्सबाबत जनजागृती
सिंदेवाही- आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असून प्रशासनाने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ बरोबर ‘व्हीव्हीपॅट’ मशिन वापरण्यात येणार आहे. याची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून याबाबत प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. ठिकठिकाणी जाऊन नागरिकांना याची माहिती दिली जात आहे.
त्याअनुषंगाने मतदान यंत्र व ‘व्हीव्हीपॅट’ बाबत सर्वंकष प्रसार, प्रसिद्धी व जनजागृती होण्याच्या दृष्टीने दि. 27 /12/2023 रोजी दुपारी 4 वाजता नगरपंचायत सिंदेवाही येथे ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ चे शहरातील नागरिकांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी मंगेश तुमराम नायब तहसिलदार सिंदेवाही, मंडळ अधिकारी रवींद्र चिडे, तलाठी अक्षय झाडे, पंकज नागपुरे, धनश्री कनाके, राजेश कनाके इ. उपस्थित होते.सदर प्रात्यक्षिक 12 जानेवारी पर्यंत सिंदेवाही तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये दाखविण्यात येणार असल्याचे मंगेश तुमराम नायब तहसिलदार सिंदेवाही यांनी सांगितले आहे.