महारेशीम अभियान नोंदणीला 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
भंडारा दि. 27 : महारेशीम अभियानास 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभियानामध्ये कृषी विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद व रेशीम विभाग संयुक्तपणे दिलेला 25000 एकरच्या लक्षांकाच्या दुप्पट नोंदणी करण्याचे आवाहन रेशीम संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
19 डिसेंबर, 2023 पर्यंत रेशीम विभागाअंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये 7 हजार 762 शेतकऱ्यांनी 8 हजार 440 एकरसाठी 500 रुपये नोंदणी शुल्क भरून नोंदणी केली आहे. ही नोंदणी लक्षांकाच्या दुप्पट होण्याच्या अनुषंगाने महारेशीम अभियानास 30 डिसेंबर, 2023 पर्यंत दहा दिवसाची मुदतवाढ रेशीम संचालनालयाकडून देण्यात आली आहे. तेव्हा कृषी विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद व रेशीम विभाग संयुक्तपणे अभियान राबवून मोठ्या प्रमाणात शेतकरी नोंदणी करण्याचे आवाहन संचालक (रेशीम) गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.