मतदारांपर्यंत पोहचणार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीचा चित्ररथ
Ø जिल्ह्याधिका-यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ रवाना
चंद्रपूर, दि. 23 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आगामी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणुका – 2024 च्या अनुषंगाने, इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (ईव्हीएम) व व्हीव्हीपॅट वापराबाबत एलईडी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत राबविण्यात येणार असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते नियोजन भवन येथे चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आगामी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने ईव्हीएम / व्हीव्हीपॅटबाबात प्रचार प्रसिध्दी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 2032 मतदान केंद्र, प्रत्येक शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, गाव / शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ, नाका, शासकीय कार्यालये, सभेची ठिकाणे इत्यादी मौक्याच्या ठिकाणी फिरत्या वाहनांद्वारे सदर मोहीम राबविण्यात येईल. या जनजागृती मोहिमेमध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे.
पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेमध्ये मतदान प्रक्रियेसंबंधी माहिती जाणून घेणे, मतदान यंत्राबाबत आवश्यक माहिती घेणे, प्रत्यक्ष मतदान करणे, आपण केलेल्या मतदानाप्रमाणेच निकाल येतो का, ते तपासणे, याबाबत नागरिकांच्या मनात काही शंका असल्यास त्याचे निरसन करणे, तसेच व्हीव्हीपॅटबाबत माहिती जाणून घ्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारांपर्यंत ही जनजागृती मोहीम पोहचेल, असे नियोजन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सर्व मतदारांनी घ्यावा. तसेच येणा-या निवडणुकीत आपल्या मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दगडू कुंभार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.