राज्य पुरस्कृत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत 270 गटामार्फत होणार नैसर्गिक शेती नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे– जिल्हाधिकारी
भंडारा दि. 19 : शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा पोत खालावलेला आहे. सुपीक जमीन ही निसर्गाची देणगी असून तीची योग्य काळजी घेतल्यास ती एक चिरकाल ठेवा आहे. जमिनीतील जीवसृष्टीच्या वाढीसाठी पोषक वातावरण ठेवल्यास जमिनीचे आरोग्य चांगले राहते. जमिनीचा सजीवपणा प्रामुख्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थाच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवर अवलंबून असतो. जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा जमिनींच्या सुपिकतेसाठी महत्वाचा घटक असून जमिनीमध्ये असलेल्या जिवाणुसाठी व जीवजंतूसाठी महत्वाचे माध्यम आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्वाचा गुणधर्म असल्याने जमिनीची सुपिकता व सच्छिद्रता, जिवाणूंची अभिक्रिया अन्नद्रव्यांची उपलब्धता, जमिनीचे तापमान, कणांची जडणघडण, पिकासाठी टाकण्यात येणाऱ्या खतांचे विघटन इत्यादीसाठी सेंद्रिय कर्बाची आवश्यकता असते. यासाठी साधारणतः जमिनीमध्ये १.०% पेक्षा जास्त सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असणे आवश्यक आहे..
रासायनिक खतांचा अति वापर, पिकांचे अवशेष जाळणे, पिकाची योग्य फेरपालट न करणे. मशागतीच्या आयोग्य पध्दती, गाई-म्हशींचे घटते प्रमाण आणि त्यामुळे शेणखताचा कमी वापर इत्यादी कारणामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाणात लक्षणीय घट होत असून सद्यस्थितीत सर्वसाधारणपणे ०-४० पेक्षा कमी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडून जमिनी नापिक होणे, अशा जमिनीत रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी असल्याने रासायनिक खतांच्या वापरात वाढ होणे परिणामी उत्पादन खर्च वाढणे अशा दुष्टचक्रात अडकुन उत्पादनाची शाश्वतता न राहणे इत्यादी दुष्परिणाम दिसून येत आहेत. अशा जमिनीतुन उत्पादित होणा-या मालाची पोषणमुल्ये खालावलेली आढळतात. अशा जमिनीत घेतल्या जाणा-या पिकांची किड व रोगांना प्रतिकारक्षमता कमी असल्याने रासायनिक औषधांच्या/किडनाशकांच्या अतिरीक्त वापरामुळे जमिन व पाणी प्रदुषित होते, तसेच अशा पध्दतीने पिकविलेल्या अन्नामध्ये उर्वरीत किटकनाशकांचे प्रमाण कमाल मर्यादेपेक्षा अधिक असल्याने एकाअर्थी असे अन मानवी आरोग्यास हानीकारक ठरते. त्यामुळे मानवी शरीराच्या प्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम होतो प्रदुषित जमिन, पाणी आणि अन्न यांमुळे मानवाबरोबर पाळीव प्राणी, पक्षी तसेच संपूर्ण जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होतो.
विषमुक्त अन्न, प्रदुषण विरहीत जमिन व पाणी आणि एकुणच शाश्वत कृषि उत्पादनासाठी नैसर्गिक / संद्रिय शेती हा पर्याय आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यात नैसर्गिक सेंद्रिय शेतीसाठी अभियान राबविण्यात येत आहे.यादृष्टीने राज्यात नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणेकरीता डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेला सन २०२२-२३ ते सन २०२७-२८ या कालवधी करिता मुदतवाढ देऊन मिशनची व्याप्ती राज्यभर वाढविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. मिशनच्या नावात बदल करून “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” असे नामकरण करण्यात आले आहे. सदर मिशनची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्यात आली असून भंडारा जिल्ह्यात प्रति वर्ष 90 गट याप्रमाणे पुढील 3 वर्षात 270 गटांची स्थापना करण्यात येणार आहे.
मिशनची उदिष्टे:
- नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर थांबवून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपिकता व आरोग्य सुधारणे.रसायनमुक्त सुरक्षित, सकस व पोषणयुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणे.
- नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मुल्यसाखळी विकसित करणे
- नैसर्गिक व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे आणि कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र यांच्या समन्वयाने नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखालील क्षेत्रात वाढ करणे.
- समुह संकल्पनेव्दारे 270 उत्पादक गटांची स्थापना करणे आणि गटांचे समुह तयार करून 27 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे.
- शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर शेतावरील जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करुन स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे.
योजनेतर्गत 50 हे चा सलग क्षेत्राचा एक गट तयार करून त्यांची नोंदणी आत्मा कार्यालयाकडे करायची आहे. प्रति 10 गट मिळून एका शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना करावयाची आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना गावापातळीवर प्रति वर्ष 3 प्रशिक्षणे देण्यात येतील, गट व शेतकरी उत्पादक कंपनी स्तरावर जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र उभारण्यात येतील. शेतकरी उत्पादक कंपनी च्या भागधारकांना 5 लाख मर्यादेपर्यंत समभाग निधीही उपलब्ध करून देण्यात येईल
तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आत्मा, कृषि विभाग, माविम व उमेद यांचेमार्फत सदर योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शेतकरी बांधवाना केले आहे.