जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला, वक्तृत्व व लघुपट स्पर्धेचे आयोजन
स्पर्धकांनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे
– मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन
भंडारा दि. 15 : जल शक्ती मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या निर्देशान्वये जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी भंडारा जिल्ह्यात जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला, वक्तृत्व व लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक, माध्यामिक, ज्युनिअर व सिनियर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर एम. कुर्तकोटी यांनी केले आहे.
जल शक्ती मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता विभागाने जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या व्यापक जनजागृतीसाठी माहिती शिक्षण व संवादाचे विविध उपक्रम राबविण्याबाबत निर्देश दिले. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये निबंध व चित्रकला, ज्युनिअयर व सिनियर महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा तसेच जिल्ह्यात लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक व माध्यमिकस्तरावरील शाळांमध्ये 22 डिसेंबर 2023 ला निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेकरीता 1) पाऊस पाणी संकलन, 2) पाणी आडवा पाणी जिरवा, 3) जल हेच जीवन, 4) माझ्या गावातील पाणी पुरवठा, 5) जल जीवन मिशन व माझ्या गावाचा विकास, 6) जल संवर्धन काळाची गरज तसेच चित्रकला स्पर्धेकरीता 1) पाऊस पाणी संकलन, 2) पाणी आडवा पाणी जिरवा, 3) जल हेच जीवन, 4) माझ्या गावातील पाणी पुरवठा, 5) जलसंवर्धन व पाण्याचे महत्व, 6) पाण्याचे वितरण व कर प्रणाली, 7) पाणी पुरवठा योजनेतील लोकसहभाग आणि पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरूस्ती आदी विषय ठेवण्यात आले आहे. दोन्ही प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील स्पर्धेच्या पुरस्काराकरीता प्रथम 21 हजार, द्वितीय 11 हजार, तृतीय साडेपाच हजार रूपये पुरस्काराचे स्वरूप आहे.
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ज्युनियर व सिनियर स्तरावर दिनांक 27 डिसेंबर 2023 ला आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही गटातील वक्तृत्व स्पर्धेकरीता 1) पाऊस पाणी संकलन, 2) पाणी आडवा पाणी जिरवा, 3) जल हेच जीवन, 4) माझ्या गावातील पाणीपुरवठा, 5) पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, 6) जलसंवर्धन, 7) पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरूस्ती आदी विषय देण्यात आले आहे. दोन्ही गटाकरीता स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येईल. त्यामध्ये अनुक्रमे 21 हजार, 11 हजार व साडेपाच हजार रूपये पुरस्काराचे स्वरूप आहे.
यासोबतच जिल्ह्यात लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 2 जानेवारी 2024 पर्यंत जिल्ह्यातील स्पर्धकांकडून लघुपट जिल्हास्तरावर मागविण्यात आले आहे. याकरीता 1) पाण्याचे शाश्वत स्त्रोत, 2) पाणी पुरवठा देखभाल दुरूस्ती, 3) जल संवर्धन, 4) हर घर जल घोषित गाव विकास, 5) जल जीवन मिशन यशोगाथा, 6) विविध योजनांचे कृती संगम आदी विषय देण्यात आले आहे. याकरीता प्रथम 31 हजार, द्वितीय 21 हजार तसेच तृतीय 11 हजार रूपये पुरस्कार देण्यात येईल. निबंध, चित्रकला, वक्तृत्व व लघुपट स्पर्धेकरीता पुरस्कार रोख रक्कम, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र देऊन स्पर्धकांचा गौरव करण्यात येईल. जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम. एस.चव्हाण यांचे नेतृत्वात जिल्ह्यात स्पर्धा आयोजित करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. शाळा व महाविद्यालय व तालुकास्तरावर स्पर्धेची अंमलबजावणी गट विकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांचेकडे सोपविण्यात आली आहे. गट संसाधन केंद्र (पा.व स्व.) पंचायत समिती (सर्व) यांचेशी संपर्क साधून स्पर्धेबाबत अधिक माहितीस्पर्धकांना घेता येणार आहे.
जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या व्यापक जनाजगृतीकरीता जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, वक्तृत्व व लघुपट निर्मिती स्पर्धेकरीता जास्तीत जास्त संख्येनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. समीर एम. कुर्तकोटी यांनी केले आहे.