पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विकासकाला लाभ देऊन कोट्यवधींचा भ्रष्टाचार
याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना घरी बसवा
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेत घणाघात
नागपूर, दि. ११ – मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिका विविध कामे करत असतात. मात्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये या योजने अंतर्गत विकासकाला अव्वाच्या सव्वा लाभ देऊन महापालिकेच्या निधीची लूट केली आहे. याप्रकरणी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी केली तर अनेक अधिकारी घरी जातील, असा घणाघात आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला.
विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते श्री. वडेट्टीवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये झालेल्या या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला. मनपाचा भूखंड हा महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने खाजगी विकासकाकडून विकास करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नियमावली असताना ती डावलून निर्णय घेण्यात आला. मनपाच्या वाकड भागातील आरक्षण क्रमांक ४/३८ हा ट्रक टर्मिनल आणि ४/३८ अ हा पीएमपीएमएल डेपो साठी आरक्षित करण्यात आला होता. त्याच्या विकासासाठी संबंधित विकासकाला नियम डावलून टीडीआर देण्यात आला. याशिवाय केवळ तीन दिवसात महापालिकेनेही कार्यतत्परता दाखवून केवळ तीन दिवसात करारनामा, पाय खोदकाम दाखला आणि अन्यूईटी टीडीआर देण्याची कमाल केली.
ते म्हणाले की, वास्तविक जोत्यापर्यंत काम होईपर्यंत टीडीआर देण्यात येत नाही. मात्र याप्रकरणी तो देण्यात आला. विकासकाकडून २८ कोटी ४० लाख एवढी बँक गॅरंटी घेणे आवश्यक असताना केवळ एक लाख रुपयांची बँक गॅरंटी घेण्यात आली. यातूनच सर्व प्रकार स्पष्ट होत असल्याचे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.