अवैद्य रेती उपसा संदर्भात तातडीने कार्यवाही करुन कंपनीकडून दंड वसुल करावा
चंद्रपूर जिल्हयातील विहीरगाव परिसरातील नाल्यात मुबलक प्रमाणात रेती साठा जमा झाल्याने येथे तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. या नाल्यातून अवैद्यरित्या रेती उपसा सुरू आहे. परंतु प्रशासनाने यासंबंधी कारवाई करण्याऐवजी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
राजूरा ते गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, या रस्त्याच्या कामात पांढरपौणी, खमोना व मुठरा या नाल्यातून परवानगीपेक्षा अधिक पटीने रेती, मुरूम व दगडाचे उत्खनन करण्यात येत आहे. उत्खनन करण्यापूर्वी जागेचे सिमांकन केले जाते. तसेच अटी व शर्तीच्या अधीन राहून उत्खनन करण्याचे निर्देश विभागाचे असतात. परंतु, अनेक नाल्यांचे सिमांकनच केलेले नाही. त्यामुळे संबंधित जीआरआयएल या कंपनीकडून मनमानी पद्धतीने उत्खनन सुरू असल्यामुळे या नाल्यांचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. परिणामी शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. यासंदर्भातील अहवाल तहसिलदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. परंतु कार्यवाही मात्र झालेली नाही. तरी, अवैद्य रेती उपसा संदर्भात शासनाने तातडीने कार्यवाही करुन कंपनीकडून दंड वसुल करावा.