अन्न व औषध प्रशासनाचे बळकटीकरण करणार – ना. धर्मरावबाबा आत्राम

नागरिकांना निर्भेळ, स्वच्छ व सकस अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे बळकटीकरण करणार – ना. धर्मरावबाबा आत्राम

◆ अन्न व औषध कार्यालयाच्या नवीन वास्तुचे कोनशिला अनावरण व भूमीपूजन

गडचिरोली, दि.10 : निरोगी आयुष्यासाठी उत्तम आहार हा महत्वाचा घटक आहे. कोरोनाच्या महामारीनंतर नागरिक स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक जागृत झाले असून अन्नधान्यामध्ये भेसळ रोखण्यासाठी तसेच नागरिकांना निर्भेळ, स्वच्छ व सकस अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे बळकटीकरण करणार असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.

गडचिरोली येथे सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या नवीन  वास्तुचे कोनशिला अनावरण व भूमीपुजन करतांना ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यु काळे, जिल्हाधिकारी संजय मिना, सहआयुक्त विराज पौनिकर, कृष्णा जयपुरकर,  सहायक आयुक्त अभय देशपांडे,  सा.बा. विभागाच्या अधिक्षक अभियंता नीता ठाकरे आदी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्हयातील जनतेस निर्भेळ, स्वच्छ सुरक्षित व सकस अन्न मिळण्याची निकड लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास 750 रिक्त पदे भरण्याची प्रक्रीया सुरू केल्याचे ना. आत्राम यांनी सांगितले.            विभागाअंतर्गत ईट राईट इनीसिएटीव्ह मोहिम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत कॉलेज कॅन्टींग, मंगल कार्यालय, लग्न समारंभ, कॅटरींग तसेच मंत्रालयीन कॅन्टींन, या सर्व ठिकाणी परवाना घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सदर वास्तु लवकरात लवकर पूर्ण करून कार्यान्वित करण्यात येईल, असे सांगितले, तर आयुक्त अभिमन्यु काळे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे ध्येय व कार्याबददल माहिती देऊन शासनाकडून गडचिरोली जिल्हा कार्यालयासाठी निधी मंजूर केल्या बददल आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.

गडचिरोली येथे 33 हजार चौरस फुट इतका भुखंड या कार्यालयासाठी शासनाकडून मिळालेला आहे. तसेच वास्तु बांधकाम करण्याकरीता मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या  प्रयत्नाने रुपये  7 कोटी इतके अनुदान मंजूर झाले आहे. कार्यक्रमाला अन्न व्यावसाईक व केमिस्ट बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.