नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा नमो महारोजगार मेळावा– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ø राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे थाटात उद्घाटन
Ø हजारो उमेदवारांना नियुक्ती मिळण्याची शक्यता
Ø उद्या सायंकाळी 5 वाजता शानदार समारोह
नागपूर दि.9 : नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात होत असलेला आजचा नमो महारोजगार मेळावा जागतिक दर्जाचा आहे. हा मेळावा रोजगार देणारे आणि घेणारे यांचे संयुक्त व्यासपीठ असून बेरोजगारी मुक्त नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा हा मेळावा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 9 व 10 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. सकाळी 11 वाजता या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दटके, प्रसाद लाड, अभिमन्यू पवार, विकास कुंभारे, आशिष जायस्वाल, मोहन मते, कृष्णा खोपडे, विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, टेक महिंद्रा कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष निखील अलुरकर यावेळी उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी 60 हजार तरूणांनी नोंदणी केली होती. 798 आस्थापना या ठिकाणी मुलाखतीसाठी आल्या आहेत. 48 हजार 541 उपलब्ध जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी विद्यापीठ परिसरात तीन मोठी दालने उभारण्यात आली आहे. उद्यापर्यंत हजारो उमेदवारांना विविध आस्थापनामध्ये नियुक्ती दिली जाण्याची शक्यता आहे.
या मेळाव्याला ऐतिहासिक आणि विक्रमी संबोधतांना उपमुख्यमंत्र्यांनी विविध आस्थापनांमध्ये त्यांचे वेगळेपण आपल्या भाषणात मांडले. केवळ मुलाखती घेऊन हा मेळावा संपणार नसून नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक सुशिक्षीत बेरोजगारांच्या नोकरीबाबत पाठपुरावा करणारी यंत्रणा आम्ही उभारली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ दोन दिवसांचा नाहीतर पुढेही अनेक दिवस चालणार आहे. मेळावा संपल्यानंतरही प्रत्येकाला संधी मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आयोजनाचे कौतुक करतांना त्यांनी कौशल्य विकास विभागाने बदलत्या तंत्रज्ज्ञानाला अनुसरून नव्या स्वरूपातील अभ्यासक्रम सुरू करावेत. रोजगार व प्रशिक्षण देण्याचे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
रोजगार निर्मिती, प्रशिक्षण व मागणीप्रमाणे मनुष्यबळाची उपलब्धता या संदर्भातील सर्व घटकांबाबत सर्वंकष धोरण ठरविण्यासाठी जागतिक बँकेसोबत रोजगार निर्मिती संदर्भात चर्चा सुरू आहे. इन्फोसिससारखा प्रकल्प 2 हजार रोजगार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात विक्रमी संख्येने रोजगार मिळतील. मात्र, आम्ही इथेच थांबलो नसून राज्य शासनामार्फत 1 लाख नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या आयोजनासाठी काम करणाऱ्या कौशल्य विकास विभागाच्या विविध अधिकाऱ्यांचे कौतुक करतांनाच स्थानिक स्तरावर पाठबळ उभे करणाऱ्या शिवाणी दाणी व त्यांच्या चमुचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केले. येणाऱ्या काळात मोठ्या प्रकल्पांमध्ये तरूणांना नोकऱ्यांची अधिक संधी असल्याचे त्यांनी सांगितले. मिहानसारख्या प्रकल्पात 2 लक्ष सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पायाभुत सुविधांच्या वृध्दीसोबतच नोकऱ्याची संधी देशभरात वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरी भागातील तरुणांप्रमाणे ग्रामीण भागही रोजगाराच्या प्रवाहात यावा, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. शेतामध्ये युरियाच्या फवारणीसाठी ड्रोनचे तंत्रज्ञान वापरणे, बांबुपासून तयार होणाऱ्या व्हाईट कोळशाची निर्मिती आदी प्रयोग महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी रोजगाराचे माध्यम ठरणार आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही उद्योजकता निर्माण करण्यासाठी, तेथील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. गडकरी यांनी केले. तरुणांना रोजगार कसा मिळेल, यासाठी एका तज्ज्ञ समितीकडून अध्ययन करून घेत सविस्तर धोरण तयार करावे, अशी अपेक्षा श्री. गडकरी यांनी राज्य सरकारकडे व्यक्त केली.
कार्यक्रमाची भुमिका विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पक्तेतून हा मेळावा नागपूर येथे साकारत आहे. बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आपला विभाग धडपड करीत आहे. त्यासाठी जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्यांना राज्यस्तरीय या मेळाव्यामध्ये पाचारण करण्यात आले आहे. उद्या भरती प्रक्रियेचा विक्रम होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सुरूवातीला या विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी प्रास्ताविक व्यक्त केले. आभार प्रदर्शन विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी केले. हजारोच्या संख्येने तरूणांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. विद्यापीठाचा परिसर तरूणाईने भरून गेला होता. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्यांची उपलब्धता यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून उद्यापर्यंत बहुतेक आस्थापनांकडून नियुक्तीपत्र दिली जाणार आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता समारोह होणार आहे.
युवकांनी भेट देण्याचे आवाहन :
9 व 10 दोन दिवस चालणाऱ्या या मेळाव्याला तरुणांनी भेट देण्याचे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. तिसऱ्या दालनात 68 स्टार्ट अप कंपन्या या ठिकाणी आपले अनुभव सांगण्यासाठी उपलब्ध आहेत. विविध विषयांवरचे मार्गदर्शन सध्या दिवसभर सुरु आहे. याशिवाय टाटा, रिलायन्स, हिंदुस्थान लिव्हर, महिंद्र ॲन्ड महिंद्र यासारख्या मोठ्या आस्थापनाकडून मुलाखती घेतल्या जात आह. हे प्रत्यक्ष युवक-युवतींनी बघावे, असे आवाहनही त्यांनी केले.