ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 – ट्रु वोटर ॲपचा वापर करुन निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब सादर करणेबाबत
गडचिरोली : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक खर्च सादर करण्यासाठी ट्रु वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य केले आहे. मात्र ट्रु वोटर ॲप डाऊनलोड केल्याचे प्रमाण खूपच नगण्य असल्याचे दिसून आल्याने आयोगाच्या दिनांक 21 नोव्हेंबर 2023 च्या पत्रान्वये निवडणूक खर्च दाखल करण्याचा 30 दिवसाचा कालावधी विचारात घेता, ट्रु वोटर ॲप डाऊनलोड करुन निवडणूक खर्च दाखल करण्याबाबत सर्व संबंधित उमेदवारांना तात्काळ सुचित करण्याबाबत कळविले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडील प्राप्त अहवालानुसार उमेदवारांना ट्रु वोटर ॲपमध्ये ऑनलाईन प्रोसेस करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे कळविले आहे.
आयोगाच्या दिनांक 07 फेब्रुवारी 1995 व दिनांक 20 जुलै 2023 च्या आदेशान्वये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसह) निवडणूक खर्चाचा हिशोब निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर 30 दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक असल्याने या निवडणूकांसाठी दिनांक 06 डिसेंबर 2023 (निवडणूकीचा निकाल- दिनांक 06 नोव्हेंबर 2023) तसेच दिनांक 07 डिसेंबर 2023 (निवडणूकीचा निकाल – दिनांक 07 नोव्हेंबर 2023- नक्षलग्रस्त/ दुर्गम भागासाठी) पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे.
सबब, ज्या उमेदवारांना ट्रु वोटर ॲपद्वारे निवडणूक खर्च दाखल करणे शक्य नाही, त्यांना निवडणूक खर्चाचा हिशोब पारंपारिक पद्धतीने सादर करण्याची परवानगी देण्यात येत आहे. असे आयुक्त, राज्य निवडणूक आयोग यांनी कळविले आहे.