राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार एकरकमी अर्थसहाय्य
Ø चंद्रपूर जिल्ह्यातील कुटुंबियांसाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश
चंद्रपूर, दि.1 : दारिद्रय रेषेखालील कुटुंबीयांना केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या एक रक्कमी अर्थसाहाय्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याला एक कोटी 19 लक्ष 80 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करून या गरीब व गरजू कुटुंबांसाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. या संदर्भात शासनादेश नुकताच निर्गमित झाला आहे.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नोंद असलेला कर्ता पुरुष किंवा स्त्री मरण पावल्यास कुटुंबीयांना एक रकमी रुपये 20,000 रुपये अर्थसहाय्य केले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील 689 कुटुंबीयांचे एप्रिल 2022 पासूनचे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत चे प्रस्ताव निधी अभावी प्रलंबित असल्याचे पत्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 30 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देऊन हा निधी तातडीने वितरित करण्याची विनंती केली होती. यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांच्या कार्यालयातून सतत पाठपुरावा केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक कोटी 19 लक्ष 80 हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली. सदर निधी उपलब्धतेच्या निर्णयामुळे प्रलंबित असलेल्या 689 कुटुंबीयांपैकी प्राथमिकतेनुसार बहुतांश कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. उर्वरित नीधीबद्दल देखील संबंधितांची सातत्याने पाठपुरावा करून जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना आधार देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही श्री. मुनगंटीवार यांनी दिली आहे. सदर निधीची रक्कम ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत लाभार्थींना कळवून वितरित करण्यात येणार आहे.
देशातील गरीब, वंचितांच्या सेवेसाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार कटिबद्ध असून गरिबांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन देखील केंद्राच्या सर्व योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.