खेळांमुळे खेळाडूवृत्ती जागृत करून सलोख्याचे वातावरण निर्माण करता येते – डॉ. नामदेव किरसान
तालुक्यातील गिलगांव येथे मित्रपरिवार क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ गिलगांवच्या वतीने आयोजित भव्य खुली कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. किरसान यांनी खेळांमुळे खेळाडू वृत्ती जागृत होऊन सलोख्याचे वातावरण निर्माण करता येते. परंतु सध्याच्या सरकारने खेळांच्या सोयीसुविधा होतकरू खेळाडूंना पुरविण्याऐवजी खेळाची मैदानं व स्टेडियम खाजगी लोकांना देण्याच्या निर्णय घेतलेला आहे असे म्हणत शासनावर ताशेरे ओढले. या खाजगीकरणामुळे गरीब खेळाडूंना खेळाच्या योग्य सोयीपासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करीत आहे. सार्वजनिक उपक्रमाच्या खाजगीकरणाचा सपाटा या सरकारने चालविलेला असल्यामुळे व शासकीय कार्यालयातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या निर्णय घेतल्यामुळे सरकारी नोकऱ्या संपुष्टात आणण्याचे काम हे सरकार करीत आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असतांना रोजगाराच्या संधी हिरावून घेण्याचे काम सरकार करीत आहे. करिता युवकांनी वर्तमान घडामोडींची जाणीव ठेवून सरकार निवडतांना या बाबी विचारात घेऊन योग्य सरकारची निवड करावी असे आव्हान केले.
यावेळी सह उद्घाटक प्रदेश युवक काँग्रेस महासचिव विश्वजीत कोवासे, माजी पंचायत समिती सदस्य रामरतनजी गोहने, डॉ. जगदीश पाटील मुनघाटे, सरपंच अशोक कुळमेथे, जिल्हा काँग्रेस महासचिव हरबा मोरे, संदीप बानबले, दिपक लाडे, माजी पोलीस पाटील आवारी, दीपक सिडाम इत्यादि मंडळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संखेने युवक व प्रेक्षक उपस्थित होते.