प्रस्तावित नवीन औदयोगिक परिसरात होणार पितळ उदयोग समुह
उद्योग विभागातर्फे उद्योग,व्यापार व गुंतवणुकी करीता विविध योजना
भंडारा, दि.22: जिल्हयात उद्योगवाढीसाठी नागपूर रोडवर खरबी-खराडी या परिसरात नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी प्रस्ताव शासनास मंजूरीकरिता सादर केला आहे. या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रामध्ये पितळ उद्योगांकरिता समुह (क्लस्टर )स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.
तसेच जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात एक तालुका एक क्लस्टर स्थापन करण्याचे दृष्टीने प्रत्येक तालुक्यातील वैशिष्टयेपुर्ण उत्पादने जसे तांदुळ,लाख,मॅगनिज,दुग्ध उत्पादने हळद,अगरबत्ती,गारमेंटस इत्यादी ओळखुन त्यांचे करिता सामुहिक सुविधा केंद्र स्थापन करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा व्यवस्थापक ,उदयोग केंद्र यांनी कळवले आहे.
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योगांच्या विकासाकरिता विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.त्यामध्ये उद्योग सुरु करण्याकरिता बेरोजगारांना नि:शुल्क उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम,उद्योगांना लागणाऱ्या भांडवलाकरीता ,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ज्यामध्ये सेवा उद्योगाकरिता रुपये 20 लक्ष व उत्पादन उद्योगाकरिता 50 लक्ष एवढया प्रकल्प किंमती करिता कर्ज योजना असून त्यामध्ये वर्गवारी तथा शहरी व ग्रामीण भागानुसार 15 ते 35 टक्के एवढी मार्जिन मनी देण्यात येतो.
तसेच उद्योगांच्या विकासाकरिता सामुहिक प्रोत्साहन योजना 2019 राबविण्यात येत असून त्यात विद्युत शुल्क माफी,मुद्रांक शुल्क माफी,विज वापराकरिता अनुदान,स्थिर गुंतवणुकीच्या कर्ज व्याजावर अनुदान आदी लाभ देण्यात येतात.
त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक उपक्रामांच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानगी व गुंतवणुकदारांना गुंतवणुक प्रोत्साहनासाठी,एक खिडकी सिंगल विंडो द्वारे सेवा मिळविण्यासाठी महाराष्ट्र उद्योग,व्यापार आणि गुंतवणुक सुविधा कक्ष मैत्री स्थापन करण्यात आला असून महाराष्ट्र उद्योग,व्यापार व सुविधा कायदा 2023 14 ऑगस्ट,2023 रोजी अधिसुचित करण्यात आला आहे.त्यासंबधी उद्योग घटकांनी maitri.mahaonline.gov.in या पोर्टलवर अर्ज करावयाचा आहे.