नको असलेले मूल कुठेही टाकून देऊ नका Ø 1098 टोल फ्री क्रमांकाला संपर्क साधा

नको असलेले मूल कुठेही टाकून देऊ नका

Ø महिला व बालविकास विभागाचे आवाहन

Ø 1098 टोल फ्री क्रमांकाला संपर्क साधा

चंद्रपूर, दि. 13 : नको असलेली गर्भधारणा झाली आणि गर्भपातही करता आला नाही, तर मग जन्माला आलेल्या मुलाचे काय करायचे, असा विचार करून ते बेवारस ठिकाणी सोडून दिले जाते. मात्र असे न करता संबंधित जन्माला आलेल्या अर्भकांना सुरक्षित निवारा प्रशासनाकडून देण्यात येतो. त्यामुळे नको असलेले मूल टाकून देऊ नका, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. तसेच याबाबत टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा, असेही विभागाने म्हटले आहे.

            जिल्ह्यात महिला व बालविकास विभाग, बालकल्याण समिती, किलबिल दत्तक संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन यांच्यासह पोलिस विभाग, आरोग्य विभाग अशा सर्व यंत्रणांकडून नवजात अर्भकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचे काम करण्यात येते. शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक, तसेच बेवारस ठिकाणी नवजात अर्भक सापडल्याचे प्रकारही मागील काही वर्षांत घडले आहेत. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हेसुद्धा दाखल केले आहेत.

नको असलेले मूल जन्माला आले तर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या घटनेत मूल नको असल्यास व जन्म द्यावा लागला व त्यानंतर पालनपोषण करण्यास असमर्थ असल्यास संबंधितांनी त्याबाबतची माहिती हेल्पलाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर तसेच पोलिस यंत्रणेला द्यावी. यामध्ये संबंधिताचे नाव गोपनीय ठेवले जाते.

येथे संपर्क करा :

जिल्हा बाल संरक्षण कक्ष : जिल्हा स्तरावर ही यंत्रणा कार्यरत असून नवजात बालकाची माहिती मिळाल्यास योग्य पुर्नवसन होईपर्यंत बालकासोबत काम करत असते.

चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर माहिती दिल्यास संबंधिताचे नाव गोपनीय ठेवले जाते. बालकल्याण समितीला माहिती देऊन पुढील कारवाही चाईल्ड हेल्पलाईन करीत असते.

बालकल्याण समिती : जिल्हा स्तरावरील बालकल्याण समितीला माहिती दिल्यास समितीच्या आदेशान्वये पुढील कारवाही करून त्या नवजात बाळाला ताब्यात घेतले जाते.

पोलिस विभाग जिल्ह्यात जिवंत अर्भक सापडल्याचा घटनांमध्ये अज्ञात महिला, मातेविरुद्ध यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये गुन्हाही दाखल केला आहे. ‘अर्भक मृत’ आढळल्यास याबाबतसुद्धा गुन्हा दाखल केला जातो.

बाल कल्याण समिती घेते काळजी : नको असलेले मूल जन्माला आल्यानंतर त्याला टाकून देण्याऐवजी बालकल्याण समितीकडे संपर्क साधावा. समिती सर्व अर्भकांना सुरक्षित ठेवते.

महिला हेल्पलाईन (1091): बेवारस बाळ आढल्यास महिला हेल्पलाईनलासुद्धा माहिती देता येते. हेल्पलाईनचे सदस्य पोलिसांच्या मदतीने बाळाला ताब्यात घेऊन प्रक्रिया करतात.

पोलिसांचा भरोसा सेल : प्रत्येक पोलिस ठाण्यात भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलकडेही अशा घटना संदर्भात माहिती देता येते.  

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, सदस्या ज्योत्स्ना मोहितकर, अमृता वाघ, वनिता घुमे, सर्व पोलीस स्टेशन, बाल पोलिस पथक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था सरचिटणीस  प्रभावती मुठाळ,  हेमंत कोठारे, उपाध्यक्षा वंदना खाडे, सदस्या शीतल गौरकार, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहूर्ले, अंगणवाडी सेविका आदी  जिल्ह्यातील बालकांचे पुनर्वसन करीता महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, असे महिला व बालविकास विभागाने कळविले आहे.