बिहार येथील हरवलेल्या बालकाला मिळाले पालक
Ø महिला व बालविकास विभाग व चाईल्ड हेल्पलाईनची संयुक्त कार्यवाही
चंद्रपूर, दि. 31 : बिहार येथील हरवलेला बालक 25 ऑक्टोबर रोजी रेल्वे पोलीस दलास रेल्वे स्टेशन, चंद्रपूर येथे मिळाला. रेल्वे पोलीस दलाने बालकाबाबत चाईल्ड हेल्पलाईनला माहिती दिली. माहितीच्या आधारे महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही करण्यात आली. सर्वप्रथम चाईल्ड हेल्पलाईन टीमने रेल्वे स्टेशन, चंद्रपूर येथे भेट देत बालकाची संपूर्ण माहिती घेतली. सदर बालकाची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व बालकल्याण समितीला देण्यात आली. समितीचे आदेशान्वये आणि रेल्वे पोलीस दलाच्या समन्वयाने बालकाला शासकीय बालगृहात ठेवण्यात आले.
चाईल्ड हेल्पलाईन टीमने बालकाच्या पालकांशी संपर्क साधून 30 ऑक्टोबर रोजी बालकल्याण समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले. समितीने सर्व कागदपत्रांची तपासणी करून सदर बालकाला पालकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, सदस्या ज्योत्स्ना मोहितकर, अमृता वाघ, वनिता घुमे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहुर्ले आदींनी महत्वाची भुमिका पार पाडली.