जिल्ह्यात “बालविवाह मुक्त भारत” अभियान
Ø विविध कार्यक्रम व कॅन्डल मार्च रॅली काढून अभियानाची जनजागृती
चंद्रपूर, दि. 18 : बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्याकरीता रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन (रुदय) गडचिरोली यांच्या “असेस टु जस्टिस प्रकल्प” च्या माध्यमातून जिल्हयातील 4 तालुक्यांतर्गत प्रत्येक गावात जनजागृतीपर कार्यक्रम तथा कॅन्डल मार्च रॅली काढून शाळांमध्ये जनजागृती करण्यात आली.
जिल्हाधिकारी विनय गौडा व महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर यांच्या सहयोगातून संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम राबविणे यशस्वी झाले आहे. भारतात 300 पेक्षा जास्त जिल्ह्यात हे अभियान चालविले जात असून 2030 पर्यंत बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी समाजातील महिला व बालकांच्या नेतृत्वात हे अभियान पुढे जात आहे. या अभियानाशी संलग्न देशातील 160 अशासकीय संघटना या अभियानास सढळ हाताने मदत करीत आहे. ज्यामुळे समाजात असलेल्या कु-प्रथा यांचा समुच्चय नायनाट करण्यासाठी सर्वसामान्य जनतेकडून शपथ घेण्यात आली. सामाजिक कार्यक्रम व मार्गदर्शनाच्या माध्यमातून कॅन्डल मार्च व रॅलीच्या रूपाने घोषवाक्य व बालगीताच्या जल्लोषाव्दारे सदर कार्यक्रम जिल्हयातील चार तालुक्यात पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व रुदय संस्थेचे सचिव काशीनाथ देवगडे यांच्या मार्गदर्शनातून बाल विवाह मुक्त दिवस पार पाडला. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक नरेश मॅकलवार, बाल तस्करी समन्वयक रीना गर्णावर, समुपदेशिका राणी मेश्राम, क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकाशे, पुनम साळवे, विद्या मोरे, सोनम लाडे आदी उपस्थित होते.