जलयुक्त शिवार अभियानातंर्गत होणार वनराई बंधारे बोथली, सोनेगाव, रोहणा गावात बंधा-याचे बांधकाम पुर्ण
भंडारा, दि. 16: जिल्हयातील 100 गावात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत वनराई बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. शेतशिवारातील वाहते पाणी अडविण्यासाठी तसेच ते जमीनीत झिरपूर जमीनीतील पाणी पातळी स्थिर राहण्यासाठी या वनराई बंधाऱ्यांचा उपयोग होणार आहे.
गावातील ओढे-नाले तसेच नदीच्या पात्रातील पाणी वाहून जाते. त्या वाहत्या पाण्याला ठराविक अंतराव साखळी पध्दतीने वनराई बंधारे बांधुन अडवणे व मुरवणे शक्य आहे. यातून पाणी टंचाईची झळ कमी करण्यासाठी तसेच काही काळ दुष्काळ थोपविण्यासाठी या बंधा-याची मदत होते.
वनराई बंधा-यामुळे पावसाळयानंतर वाहून जाणारे पाणी अडण्यास व मुरण्यास मदत होते. तसेच भूजल पातळी उंचावून परिसरातील विहीरी व बोअरवेलीची पाणी पातळी वाढण्यास मदत होते.रब्बी पिकांना संरक्षीत पाणी मिळते. पेयजल स्रोवातांच्या शाश्वतेसाठी उपयुक्त ठरते.
नुकत्याच झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या बैठकीत 100 गावामध्ये उपविभागस्तरीय समीतीच्या माध्यमातुन वनराई बंधारे बांधकामाचे नियोजन सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
बोथली, सोनेगाव, रोहणा, डोंगरगाव रिठी येथे लोकसहभागातून बांधकाम करण्यात आल्याचे जलयुक्त शिवार जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव अनंत जगताप यांनी कळवले आहे.