उघड्यावर शौचास गेल्यास आता फौजदारीची कारवाही होणार
◾ ग्राम पंचायत अंतरगाव चा धडाकेबाज निर्णय.
◾ ग्राम पंचायत कडून देण्यात येणारे विविध दाखले देणे केले बंद.
सिंदेवाही :- पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या मौजा अंतरगाव येथील नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याने गावा सभोवताल घाण तयार झाली असून अनेक नागरिकांना सांगूनही कुणी ऐकत नसल्याने अखेर उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून ग्राम पंचायत कडून देण्यात येणारे विविध दाखले देणे सुद्धा बंद केले असल्याचा धडाकेबाज निर्णय ग्राम पंचायत कार्यालय अंतरगाव कडून घेण्यात आल्याने नागरिकांत आता भीती निर्माण झाली आहे.
घरोघरी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांना अनुदान देऊन याविषयी जनजागृती केली. निर्मलग्राम योजना, स्वच्छ भारत मिशन योजना अंतर्गत गावात १०० टक्के शौचालय बांधकाम करण्यात आले. मात्र अनेकांनी शौचालयाचे बांधकाम न करता कागदोपत्री शौचालय दाखवून अनुदान हडप केले. आणि गावाच्या बाहेर उघड्यावर घाण करणे सुरू केले. त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून तालुक्यात अंतरगाव घाणेरडे गाव म्हणून नावारूपास आले आहे. हागणदारी मुक्तीचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. त्यामुळे ग्राम पंचायत कार्यालय यांनी गावातील नागरिकांना दवंडी देऊन कुणीही बाहेर उघड्यावर शौचास जावू नये. तसे आढळल्यास फौजदारी कारवाही करून कोणतेही दाखले देणे बंद करण्यात येईल. असा फलक ग्राम पंचायत कडून गावातील चौकाचौकात लावण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात आता एकच चर्चा सुरू असून गावातील कोणत्या नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार ? याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.