सर्व विभागांनी प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावे
Ø सेवा महिनाबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
चंद्रपूर दि. 12 : शासन आणि प्रशासनामार्फत नागरिकांना उत्कृष्ट सेवा मिळावी, या उद्देशाने 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राज्य शासनाच्या वतीने सेवा महिना साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे 16 सप्टेंबर 2023 पुर्वी आपल्या विभागाकडे प्रलंबित असलेले अर्ज व सेवा महिना कालावधीत आलेले नवीन अर्ज अशा संपूर्ण प्रलंबित अर्जांवर तात्काळ कारवाई करून ते निकाली काढावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या. तसेच यासंदर्भातील जिल्ह्याचा एकत्रित अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सेवा महिना कालावधीत विविध विभागातर्फे निपटारा करण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेतांना ते बोलत होते. वीस कलमी सभागृहात झालेल्या या बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) दगडू कुंभार, अश्विनी मंजे (निवडणूक), विद्युत कंपनीच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, नगर पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार ढोके आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आपापल्या विभागाकडे प्रलंबित असलेले जुने अर्ज आणि सेवा महिना कालावधीत आलेले नवीन अर्ज 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत निकाली काढण्याचे शासनाचे आदेश आहेत. याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावयाचा असून शासन स्तरावरून याबाबत नियमित आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी प्राधान्य देऊन आपल्याकडील प्रलंबित अर्जांचा निपटारा करावा. आपल्या विभागामार्फत लाभ देण्यात येणारे महाडीबीटी पोर्टल, सार्वजनिक तक्रार पोर्टल, आपले सरकार सेवा केंद्र, महावितरण पोर्टल, नागरी सेवा केंद्र तसेच विभागाच्या स्वत:च्या संकेतस्थळावरील प्रलंबित अर्ज आदी बाबी त्वरीत तपासून घ्या, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
या 25 सेवांचा आहे अंतर्भाव : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकरणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजूरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरी करीता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यु नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र आणि प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे, या सेवांचा यात समावेश आहे.