अमृत कलश यात्रेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने सायकल व बाईक रॅली
गडचिरोली, दि.11: ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात माझी माती माझा देश’ या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशभरात “अमृत कलश यात्रा” काढण्यात येत आहे.
जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या वतीने या उपक्रमानिमित्त जिल्ह्यातही दिनांक 1 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबरपर्यंत सर्व गाव, तालुके व जिल्हास्तरावर अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहे.
09 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता गांधी चौक ते जिल्हा परिषद प्रांगणापर्यंत अमृत कलश यात्रा अंतर्गत सायकल व बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी सुद्धा सायकल चालवत त्यांची साथ दिली. रॅली मध्ये जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख व कर्मचारी सायकल व बाईक वर सोबत होते तर पंचायत विभागाचे प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र कणसे यांनी स्वतः अमृत कलश हाती घेतला.
या सायकल रॅली मध्ये जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजकुमार निकम यांच्या सोबत शाळेच्या मुला-मुलींनी सुद्धा उत्स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदविला. त्यांच्या देशभक्तीपर घोषणांनी सारा आसमंत दणाणला. सदर रॅलीचा समारोपीय कार्यक्रम जिल्हा परिषद प्रांगण येथे पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन पंचायत विभागाचे अधिकारी रविंद्र कणसे व VSTF चे जिल्हा कार्यकारी प्रशांत कारमोरे यांनी केले.