ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांचा सत्कार
चंद्रपूर,दि. 04 : ज्येष्ठ नागरीक संघ तसेच सहायक आयुक्त, समाजकल्याण, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रामनगर येथे जागतिक जेष्ठ नागरीक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, डॉ. विकास आमटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव पिंपळकर, गोपाळ सातपुते, केशव जेणेकर, पुनम आसेगांवकर, पंढरीनाथ गौरकार आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, समाजामध्ये ज्येष्ठ व्यक्तीकडे पाहण्याचा व त्यांच्या सोबत संवाद हा तुटत चालल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठांचे अनुभव आणि त्यांचे विचार हे समाजाला पुढे नेण्यासाठी प्रभावी ठरतात, त्यामुळे ज्येष्ठांच्या विचारांना व अनुभवांना आजच्या पिढीने महत्त्व देऊन प्रगती साधावी. जीवनाच्या उत्तरार्धात ज्येष्ठांच्या भावना समजून घेणे आजची गरज आहे. ज्येष्ठांचे अनुभव बघता त्यांचे विचार आणि सूचना ह्या अमूल्य आहेत. ज्येष्ठ नागरिक संघामुळे ज्येष्ठ नागरिकांना आपले विचार, भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ मिळाले असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले.
75 वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरीकांचा सत्कार :
जागतिक जेष्ठ नागरीक दिनानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण झालेले केशवराव चौधरी, पुंडलिक जाधव, आनंदराव अगडे, सुभाष वैरागडे, विजय मुक्कावार, शोभाताई पोटदुखे, प्रभाताई गट्टुवार, सुमनताई आगलावे आदी जेष्ठ नागरीकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव पिंपळकर यांनी तर संचालन एकता बंडावार यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.