एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत
जुन्या फळबागांचे होणार पुनरुज्जीवन
Ø शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 28 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2023-24 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे. योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे तसेच झाडांना व्यवस्थित आकार न देणे आदी बाबींमुळे बऱ्याचश्या जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे.
नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही राज्याच्या फळपिकांची एकूण उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब आहे. सन 2023-24 मध्ये राज्यात जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिक्कू या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम रु. 40 हजार प्रति हेक्टर ग्राह्य धरून त्याच्या 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त रक्कम रु. 20 हजार प्रति हेक्टर याप्रमाणे अनुदान देय आहे. यामध्ये कमीत कमी 0.20 हेक्टर व कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील.
जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर उत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.