सिद्धी अलोनीचे पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक
चंद्रपूर, दि २६ : विदर्भस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत मुल येथील शूरवी महाविद्यालयातील सिद्धी अलोनीने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. सिद्धी बीएससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिला मिळालेल्या या घवघवीत यशामुळे शूरवी महाविद्यालयाने जिल्ह्यात मानाचा तुरा रोवला आहे.
चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकप्रतिनिधीचे पक्षांतर लोकशाहीला आव्हान’ या विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विदर्भातील सुमारे ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेदरम्यान सिद्धी अलोनीने लोकप्रतिनिधींच्या पक्षांतरामुळे लोकशाहीवर, राजकारणावर, समाजावर व पर्यायाने विकासावर कोणता परिणाम होतो, याचे मुद्देसूद विवेचन केले.
सिद्धीचा आत्मविश्वास, मुद्दे मांडण्याची शैली, आवाजातील भारदस्तपणा यामुळे स्पर्धेचे परीक्षक प्रभावित झालेत. त्यामुळे तिला उत्कृष्ट वादविवादासाठी तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिद्धीच्या यशाचे शूरवी महाविद्यालयाच्या संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे.