संस्कार आणि ज्ञान सोबत मिळणे आवश्यक – ना. सुधीर मुनगंटीवार
Ø पुलाच्या बांधकामाचे भुमिपूजन आणि विद्यार्थ्यांचा सत्कार
चंद्रपूर, दि. 20 : ‘शिक्षण, संस्कार आणि संस्कृती’ हे महर्षी विद्या मंदीरचे ब्रिद वाक्य आहे. गुरुकूल शिक्षण मंडळाच्या या शाळेला कॉन्व्हेंट न म्हणता मंदीर म्हटले जाते आणि मंदिरात शिकणारे विद्यार्थी हे संस्कारी असतात. शिक्षण संस्कारी नसेल तर आपण फक्त साक्षर असू, मात्र सुसंस्कृत असणार नाही. त्यामुळे उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी व्हायचे असेल तर संस्कार आणि शिक्षण सोबत मिळणे अतिशय आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महर्षी विद्या मंदीर पोचमार्गावरील ब्रिज कम बंधाराच्या बांधकामाचे भुमिपूजन केल्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना ते बोलत होते. यावेळी सा.बा. कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, देवराव भोंगळे, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, गुरूकुल विद्या मंडळाचे अध्यक्ष गिरीश चांडक, सचिव दत्तात्रय कंचर्लावार, उपाध्यक्ष वसुधा कंचर्लावार, संस्थेचे सदस्य उमेश चांडक, अल्का चांडक, वीरेंद्र जयस्वाल, प्राचार्य लक्ष्मी मूर्ती, उपअभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, दाताळाच्या सरपंच सुनिता देशकर, उपसरपंच विजयालक्ष्मी नायर आदी उपस्थित होते.
स्वत:सोबतच समाजासाठी आणि देशासाठी शिकणारे विद्यार्थी घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, महर्षी विद्या मंदीरच्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले छायाचित्र तसेच पुष्पगुच्छाने माझे स्वागत करण्यात आले, याचा मला अतिशय आनंद आहे. जीवनाच्या प्रत्येक लढाईत महर्षी विद्या मंदिरचे विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील. मात्र त्यासाठी परिश्रमाची गरज आहे. चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, शिक्षणात वाघासारखाच पराक्रम करा. आपल्या भविष्यासाठी राबणा-या आई-वडीलांचा नेहमी सन्मान करा. चांगले आणि संस्कारी विद्यार्थी घडले तरच समाज घडेल आणि देशाची प्रगतीपथावर वाटचाल होईल, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
विद्यार्थ्यांचा सत्कार : शालेय शिक्षण, विविध खेळ तसेच ऑलंपियाड मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात सायन्स ऑलंपियाडमध्ये सुवर्णपदकप्राप्त तेजस उत्तरवार यांच्यासह इतर क्रिडा प्रकारात तसेच शालेय शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणारे रिया खंडारे, श्रेया बुटले, आरोही दखने, इशिका मंडल, आदिती मेश्राम, चैतन्य राऊत, दिपीका साधू आदींचा सत्कार करण्यात आला.
डीजीटल लँग्युस्टीक मेंटॉरचे उद्घाटन : विद्यार्थ्यांकडून होणारा इंग्लिश भाषेचा चुकीचा उच्चार आता डीजीटल लँग्युस्टीक मेंटॉरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे म्हणता येणार आहे. 20 संगणक असलेल्या या कक्षाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पोचमार्गावरील पुलाचे भुमिपूजन : महर्षी विद्या मंदीर येथे जाण्यासाठी असलेला पुल हा अतिशय रुंद असल्यामुळे येथे पुलाची सर्वांची मागणी होती. 2 कोटी 36 लक्ष 68 हजार निधीतून आता नवीन ब्रिज येथे तयार होणार आहे, याचा आनंद आहे. 6 महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होईल, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. प्रशासकीय मान्यतेनुसार अस्तित्वातील पुलाची दुरुस्ती, जुन्या पुलापेक्षा 30 से.मी. उंच आणि 30 मीटर लांब नवीन पुलाचे बांधकाम, पोच मार्गाचे संरक्षण भिंतीसह नालीचे बांधकाम आदींचा यात समावेश आहे.