शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची प्रक्रिया पुर्ण करावी Ø 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
चंद्रपूर, दि. 18: केंद्रशासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत शासनामार्फत आदिवासी विकास महामंडळ धानाची खरेदी करीत असते. यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकाची ई-पीक प्रक्रिया पुर्ण करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली, त्या सर्व शेतकऱ्यांची ई-पीक प्रक्रिया नोंदणी करणे आवश्यक आहे. जर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर धान विक्रीला अडचण निर्माण होऊ शकते. त्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी त्वरीत ई-पीक पाहणीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एन. झेड. येरमे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी प्रक्रियेसोबतच धान विक्रीसाठी ज्या बँक खात्याची व्यवहारासाठी निवड केली जाते, त्या बँक खात्यासोबत आधार जोडणी करावी. व सदर बँक खाते अद्ययावत ठेवावे. तसेच सदर बँक खाते जनधन योजनेत समाविष्ट नसल्याची खात्री पुर्ण करून घ्यावी. संयुक्त असल्यास खातेदार क्रमांक 1 चे आधार जोडणी करून घ्यावी किंवा स्वतंत्र खाते सुरू करावे. या सर्व प्रक्रिया शेतकरी नोंदणी सुरू होण्यापुर्वी पूर्ण कराव्यात. जेणेकरून, शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास शक्य होईल.
ई-पीक पाहणी करण्याची अंतिम दि. 25 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व शेतक-यांनी ई-पीक पाहणी प्रक्रिया लवकर पूर्ण करून केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे.