दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’
उपक्रमाचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
चंद्रपूर दि.15 : विविध प्रवर्गातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 26 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सदर कामाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मनपा आयुक्त विपीन पालिवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिरी डॉ. राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद कांबळे, जि.प. समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार ढोके आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महानगरपालिका, नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींनी आणि विविध शासकीय विभागांनी दिव्यांग लाभार्थ्यांची यादी अपडेट ठेवावी. एकाच छताखाली दिव्यांग बांधवाना लाभ देण्यात येणार असल्याने विविध योजनांचे जनजागृतीपर स्टॉल, प्रमाणपत्रांचे वाटप आदींचे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.