वरोरा शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाला मोठे यश
दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल वरोरावासीयांकडून ना. मुनगंटीवार यांचे आभार
चंद्रपूर, दि. 14 : वरोरा शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न लवकरच निकालात काढण्यात येईल व या शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईल, असा शब्द जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी वरोरा येथे ई लायब्ररीचे उद्घाटन करताना वरोरा वासीयांना दिला होता. याबाबत त्यांनी सतत पाठपुरावा केल्याने वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारे पाणी आरक्षण जलसंपदा विभागाच्या 13 सप्टेंबर 2023 रोजीच्या पत्रान्वये वाढवून देण्यात आले आहे. त्यामुळे आता वरोरा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. अवघ्या वीस दिवसात पाणी आरक्षण मिळवून दिल्याने नागरिकांनी पालकमंत्री यांचे आभार मानले आहे.
सन 2055 या वर्षात वरोरा शहराची लोकसंख्या जवळपास 62 हजार इतकी गृहीत धरून वाढीव शहरी पाणीपुरवठा योजनेसाठी वार्षिक 3.66 दलघमी पाणी लागणार आहे. त्यानुसार मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर यांचे 13 सप्टेंबर 2023 रोजीच्या पत्रान्वये 2.70 दलघमी अतिरिक्त पाण्याचे आरक्षण वर्धा नदीवरील मार्डा बॅरेज येथून उचल करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे जुने 0.96 दलघमी पाणी आरक्षण व नव्याने मंजूर केलेले 2.70 दलघमी असे एकूण 3.66 दलघमी पाणी आरक्षण वरोरा शहरासाठी मंजूर झाले आहे. या पाणी आरक्षणनुसारच आता वरोरा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
वरोरा शहरासाठी अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना सन 1972 पासून कार्यान्वित आहे. या योजनेला आता 50 वर्षे पूर्ण झाले असून सन 2011 च्या लोकसंख्येनुसार वरोरा शहराची लोकसंख्या 46,532 एवढी आहे. शहराचे आधुनिकीकरण व औद्योगिक वसाहतीमुळे पाणीपुरवठा मागणी वाढली असल्याने जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत होती. नगर परिषद वरोरा यांच्या मागणीनुसार 135 लिटर प्रति दरडोई निकषाप्रमाणे सन 2055 प्रकल्प वर्षासाठी शहराची लोकसंख्या जवळपास 62000 इतकी गृहीत धरून नवीन पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
25 ऑगस्ट 2023 रोजी शहरात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी ई लायब्ररीच्या उद्घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आले असता, नागरिकांकडून वाढीव पाणीपुरवठा योजनेबाबत मागणी करण्यात आली होती. वरोरा शहराच्या नागरिकांची ही मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शहरासाठी लवकरच वाढीव पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात येईल, असा शब्द दिला होता. त्याची पूर्तता केवळ 20 दिवसात झाल्याने वरोरा वासीयांकडून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.