स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना प्लॅन बी तयार ठेवा– जिल्हाधिकारी विनय गौडा
Ø “यथावकाश” कहानी स्पर्धा परीक्षावाल्यांची चित्रपटाचे आयोजन
चंद्रपूर दि.13 : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होणे हे अनेकांच्या आयुष्याचा ध्येय असते. लाखो उमेदवार अधिकारी बनण्याचे स्वप्नं पाहतात. मात्र प्रत्येकालाच यश मिळेल असे नाही. अपयश पदरात पडल्यावर आयुष्य थांबते असे नाही. त्याकरीता प्लॅन बी देखील तयार ठेवा, जेणेकरून कोणत्याही क्षेत्रात गेल्यास पुढे पाऊल ठेवता येईल, अशा मार्गदर्शन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांना केले.
जिल्हा प्रशासनातर्फे “यथावकाश” कहानी स्पर्धा परीक्षावाल्यांची या चित्रपटाचे आयोजन प्रियदर्शनी सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, तहसीलदार प्रिती डुडूलकर, कवी श्रीपाद जोशी, आशिष देव, जीवतीचे तहसिलदार अविनाश शेंबटवाड यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, “यथावकाश” या चित्रपटात स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांचे ज्वलंत प्रश्न दर्शविण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी स्वप्ने असतात. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना प्लॅन-बी देखील तयार ठेवावा. स्पर्धा परीक्षेची तयारी योग्य नियोजनासह करावी व ध्येय गाठावे. मिळालेले यश स्वत:साठी तसेच समाज व देश घडविण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल, असे ते म्हणाले.
कवी श्रीपाद जोशी म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक तरुण तरुणींचा कल एम.पी.एस.सी व यु.पी.एस.सी स्पर्धा परीक्षेची तयारीकडे असल्याचे निदर्शनास येते. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसमोर फक्त अभ्यासच असतो. आयुष्य पणाला लावून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरीता येत असतात. विद्यार्थ्याच्या ज्वलंत प्रश्न तहसीलदार शेंबटवाड यांनी मांडला असून अभ्यासकांना हा चित्रपट नक्कीच प्रेरक ठरेल.
आशिष देव म्हणाले, स्पर्धा या विषयावर अत्यंत ज्वलंत चित्रपट तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत बॅकअप प्लॅन तयार ठेवावा. जेणेकरुन अपयश आल्यास आयुष्य अंधकारमय होणार नाही. जिथपर्यंत रस्ता दिसेल तिथपर्यंत जावे, समोरचा रस्ता नक्कीच सापडतो. स्पर्धा ही निकोप असावी. कार्य करण्यासाठी अनेक क्षेत्रे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी प्रवाही राहावे. चिकाटी अंगी बाळगावी. त्यासोबतच पराभवाचे विश्लेषण करावे. यशाला गवसणी घालण्यासाठी संघर्ष महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.
“यथावकाश” चित्रपटाविषयी :
पुण्यातील सदाशिव पेठेच्या अरुंद गल्ल्यांमध्ये मागील कित्येक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिळून त्यांची कैफियत सांगण्यासाठी बनवलेला बहुचर्चित ‘यथावकाश’ नावाचा हा सिनेमा आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांचे प्रश्न या ज्वलंत विषयावर भाष्य करणारा हा एक सामाजिक चित्रपट आहे. या चित्रपटाची संपूर्ण निर्मिती ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी मिळून केली आहे. या सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन नुकतेच तहसीलदारपदी निवड झालेले अविनाश शेंबटवाड यांनी केले आहे.
यामध्ये प्रमुख भूमिकेत प्रसिद्ध युट्युबर जीवन आघाव व उपजिल्हाधिकारी सायली सोळंके, निलेश कुमार, प्रतीक लांडे, नकुल पागोटे हे आहेत. त्यांच्यासोबत सुनील गोडबोले व अजित अभ्यंकर या कलावंताचा देखील समावेश या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचे संगीत सुमेध अरुण व वेदांग देशपांडे यांनी दिले आहे, छायाचित्रण रवी उच्चे व अजय घाडगे, कला दिगदर्शन प्रिय जाधव, संकलन दीपक चौधरी व ध्वनिमुद्रण अजिंक्य जुमले यांनी केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दाहक वास्तव हा सिनेमा प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमाची संपूर्ण टीम ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. शेवटी आपली कहाणी आपणच जगाला सांगणार, असे दिग्दर्शक अविनाश शेंबटवाड आणि त्यांच्या टीमचे या चित्रपटाच्या कल्पनेबद्दल म्हणणे आहे.