आरोग्य प्रशासन राबविणार दि.13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत आयुष्मान भव मोहिम
भंडारा,दि. 12 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दि.13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हयातील सर्व आरोग्य संस्थामध्ये आयुष्मान भव मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला एकाच आरोग्य संस्थेत विविध आरोग्य योजनांचा लाभ मिळावा हे या मोहिमेचे उध्दिष्ट असुन, या करीता आरोग्य प्रशासन सज्ज झाले आहे.
दि.13 सप्टेंबर 2023 रोजी महामहिम राष्ट्रपती महोदया आयुष्मान भव मोहिमेचे देशात उदघाटन करणार आहेत.आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत –1) आयुष्मान आपल्या दारी 3.0 :- या उपक्रमाअंतर्गत देशात 25 कोटी तर जिल्हयात 2,28,804 आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचेल यासाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करुन कार्ड वाटप करण्यात येणार आहे.
2) आयुष्मान सभा :- या उपक्रमाअंर्गत गावपातळीवर आरोग्य सेवा, सुविधांची जनजागृती करण्याकरीता ग्राम पंचायत व ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती यांचे मार्फंत राबविण्यात येते. सदर मोहिमेचे मुळ उध्दिष्ट आयुष्मान कार्ड व आभा कार्ड बाबत जनजागृती करणे, आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फंत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण, क्षयरोग व कुष्ठरोग इ.बाबत जनजागृती करणे तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर मिळणाऱ्या सेवा सुविधांचे मुल्यमापन करणे आहे.
या सभांद्वारे खालील उपक्रम घेण्यात येणार आहे.
अ)आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करणे. ब) प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना व पात्र लाभार्थी यादी प्रसिध्द करणे. क) या योजनेअंतर्गत संलग्न रुगणालयांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. ड) असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, आयुष्मान कार्ड व आभा कार्ड यांची जनजागृती व हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
3) आयुष्मान मेळावा :- अ) आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवडयातील शनिवार खालील थीमनुसार उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येतील.आठवडयाचे विशिष्ट मुख्य थीम. आठवडा 1 :- एनसीडी स्क्रिनींग (मुधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग-तोंड, गर्भाशय, ग्रीवा आणि स्तनकर्करोग) आठवडा 2 :- क्षयरोग, कुष्ठरोग आणि इतर संसर्गजन्यरोग.आठवडा 3 :- माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि लसीकरण. आठवडा 4 :- नेत्ररोग तपासणी आणि नेत्र निगा सेवा.
सदर मेळाव्या दरम्यान आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करणे, सर्व समावेशक आरोगय सेवा, आयुष, मानसिक आरोगय, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा, योगा व वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी तसेच टेलीकन्सलटेशन सेवा देण्यात येणार आहेत.
ब) ग्रामिण रुग्णालयस्तरावर वैद्यकिय तज्ञांकडून सेवा पुरविण्यात येणार आहे. 4) अंगणवाडी व शाळा मधील मुलांची आरोग्य तपासणी :- सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांसाठी विशेष मोहिम राबवून 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.यात जन्मजात विकृती, शारिरीक मानसिक विकार, कुपोषण व 32 प्रकारच्या आजारांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. त्याच बरोबर 18 वर्षावरील सर्व पुरुषांची आरोगय तपासणी करुन, आवश्यकतेनुसार सहायक उपकरणे व शस्त्रक्रियेसाठी संदर्भसेवा देण्यात येईल.
या सोबतच आयुष्मान भव विशेष मोहिमेत सर्व आरोग्य संस्थांची स्वच्छता, रक्दान शिबीरे व अवयदान बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा प्रशिक्षण पथक, सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा येथे करण्यात येणार आहे.