शेतकरी बंधुनो…कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच करा व्यवस्थापन
चंद्रपूर,दि.11: यावर्षी जिल्ह्यात 1 लक्ष 75 हजार 247 हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. कापूस पिक हे महत्वाचे पीक असल्यामुळे त्याचे किड व रोगाचे वेळीच योग्य व्यवस्थापन सुध्दा करणे आवश्यक आहे. यावर्षी कोरपना तालुक्यातील दहेगाव येथे क्रॉपसॅप सर्वेक्षणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला असून गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी वेळीच किडींचे व्यवस्थापन केल्यास नुकसान कमी करता येईल.
रसशोषक किडींचा प्रादुर्भावाबाबत करा सर्वेक्षण:
सरासरी संख्या 10 मावा /पान किंवा 2 ते 3 तुडतुडे/पान किंवा दहा फूलकीड/पान किंवा मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा/पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 20 मि.ली. किंवा फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मि.ली. यापैकी कोणतेही एका किटकनाशकांची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कपाशीला पात्या आल्यानंतर 7 ते 8 वेळा पिकामध्ये दर 10 दिवसांनतर ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी मित्र कीटक असलेले एकरी 4 फुले ट्रायकोकार्ड झिगझॅग पध्दतीने कापसाच्या पानाच्या खालच्या बाजुला स्टॅपल करावे. सदर ट्रायकोकार्ड उपलब्धता चंद्रपूर येथील जैविक प्रयोगशाळा, ट्रायकोकार्ड निर्मीती केंद्र, कृषि चिकीत्सालय व रोपवाटीकेत उपलब्ध आहे. कपाशीच्या पिकामध्ये एकरी 4 फेरोमेन सापळे लावावे. पिकाच्या वाढीव अवस्थेच्या उंचीनुसार किमान एक फुट अंतर ठेवावे. जेणेकरून, फेरोमेन सापळ्यांचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. सापळयातील ल्युर दर 15 ते 20 दिवसानंतर बदलावी. फेरोमन सापळ्यात 8 ते 10 पतंग सतत 3 दिवस आढळल्यास त्यावर क्युनॉलफॉसची फवारणी करावी. प्रत्येक गावात, कापूस संकलन केंद्रे व जीनींग फॅक्टरीमधे 15 ते 20 कामगंध सापळे लावून दर आठवड्याने पतंगाचा नायनाट करावा. कापूस पिकातील डोमकळी ओळख प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अशा कळ्या म्हणजेच डोमकळया होय. डोमकळ्या तोडून पाकळ्यांना वेगळे केल्यास, पाकळ्या एकमेकांना लाळेद्वारे जोडल्या सारख्या दिसतात. अशा डोमकळया आढळल्यास त्या वेचून पूर्णपणे नष्ट कराव्यात. म्हणजे, त्या पुढे वाढणार नाहीत. यासाठी शेतकऱ्यांनी सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. तसेच गुलाबी बोंड अळीचे प्रभावी व्यवस्थापनासाठी पी.बी. नॉट चा वापर करावा.
गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनीधित्व करतील अशी 20 झाडे निवडून, निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे यांची संख्या मोजून त्यात गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भाव ग्रस्ताची टक्केवारी 5 टक्केपेक्षा जास्त आढळल्यास रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. कापुस पिकात गुलाबी बोंडअळीचे सर्वेक्षण करूनच तसेच आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यावरच रासायनिक किटकनाशकांची फवारणी शेतकऱ्यांनी करावी.
रासायनिक किटकनाशकाची करा फवारणी:
इमामेंक्टीन बेंन्झोएट 5 एस.जी किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के ए.एफ 25 मि.ली. किंवा क्लोरपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मि.ली. किंवा फेनप्रोपॅथ्रीन 10/30 टक्के प्रवाही 7.5 ते 10/2.5 ते 3.4 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10 टक्के प्रवाही 7.6 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याप्रमाणे वरीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारणी साठी वापरावे. शेतकरी बांधवानी शेतामध्ये सर्वेक्षण करून गुलाबी बोंड अळी प्रादुर्भाव नियंत्रीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.