बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत मातंग समाजातील अर्जदारांना मिळणार स्वयंरोजगाराची संधी
चंद्रपूर,दि. 7 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, चंद्रपूरमार्फत बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत मातंग समाजातील, अनुसूचित जातीतील हिंदू-मांग, मातंग व तत्सम 12 पोट जातीतील अर्जदारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे व समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्याकरीता शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली आहे.
या मंडळाकडून त्यांना आर्थिक सहाय्य दिल्या जाते. चालू आर्थिक वर्षात बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत रु. 50 हजार ते 7 लक्षपर्यंत जिल्ह्यात 30 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग अनुदानासह 45 टक्के तर लाभार्थी सहभाग 5 टक्के तर बँकेच्या कर्जाचा सहभाग 50 टक्के असतो. महामंडळाच्या रकमेवर 4 टक्के व्याजदर आकारण्यात येतो तर बँकेच्या रकमेवर बँकेचा व्याजदर असतो.
कागदपत्रे, अटी व शर्ती :
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व 12 फूट जातीतील असावा. 18 ते 50 वयोमर्यादा असावी. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दोन फोटो, रेशनकार्ड, आधारकार्ड, घर टॅक्स पावती, कोटेशन, व्यवसायासाठी जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल आदी आवश्यक कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष येऊन अर्ज प्राप्त करून घेत सादर करावे. लाभार्थ्याशिवाय इतर व्यक्तींकडून अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. याची लाभार्थ्याने नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकामार्फत करण्यात आले आहे.