शिंदे सरकार मराठा समाजाची बोळवण करू नका–हेमंत पाटील
ओबीसी बांधवांवर अन्याय होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी
मुंबई, ५ सप्टेंबर २०२३
राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. जालन्यात आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानवीय लाठीचार्जची सर्वत्र निंदा केली जात आहे. पंरतु,या आंदोलनामुळे समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारने वेग दिला आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही.पंरतु, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही,याची खबरदारी शिंदे-फडणवीस सरकारने घ्यावी असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी मंगळवारी केले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले तर तो इतर मागासवर्गीयांवर अन्याय ठरेल,असे मत पाटील यांनी व्यक्त केले.ओबीसी प्रवर्गात अगोदर पासूनच अनेक जाती आहेत.आताच या प्रवर्गातील जातींना आरक्षण अपुरे पडत आहे. ओबीसीतील प्रत्येक मागास जातींना योग्य प्रमाणात आरक्षण मिळावे यासाठी लढा सुरू आहे.अशात मराठा समाजालाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा अट्टाहास दृरटृष्टीचा नाही.त्यामुळे एकंदरीत आरक्षणाची मर्यादा वाढवून त्यानूसार मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी पाटील यांनी केली.
राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.पंरतु, हे दाखले कुठल्याही न्यायालयात टिकणार नाही,असे देखील पाटील म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानेच मराठा आरक्षण नाकारले असल्याने त्यांना आरक्षण देणे सोप नाही.अशात मराठा समाजाची केवळ बोळवण राज्य सरकारने करू नये.मराठा समाजाला आरक्षण द्याचेच असेल तर सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि न्यायालयात योग्य बाजू मांडावी,असे आवाहन पाटील यांनी केले. एक महिन्यात आरक्षण देवू,योग्य न्याय देवू अशा केवळ बाता सरकारने मारू नये असा टोला पाटील यांनी लगावला.