निघाली चंद्रपूरातून जनसंवाद यात्रा
चंद्रपूर, (३ सप्टेंबर २०२३):
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या धोरणांचा पदार्फाश करण्यासाठी चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने रविवारी, ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६ वाजता महाकाली माता मंदिर, चंद्रपूर येथून जनसंवाद यात्रा निघाली.
या यात्रेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामु) तिवारी, माजी अध्यक्ष विनायक बांगडे, माजी अध्यक्ष सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रेय, के. के. सिंग, दिनेश चोखारे, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, चंद्रपूर ग्रामीण महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी महापौर संगीता अमृतकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश अडूर, काँग्रेस नेते महेश मेंढे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष राहुल चौधरी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ताजुद्दीन शेख, विजय नळे, प्रशांत भारती यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या यात्रेत उपस्थित मान्यवरांनी चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली देवीचे पुजन केले. त्यानंतर माता महाकाली मंदिर येथून पदयात्रा निघाली. गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. गांधी चौक येथे सेवादल काँग्रेस चंद्रपूरद्वारा ध्वजारोहण कार्यक्रम झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे शहराच्या प्रमुख मार्गाने ही जनसंवाद यात्रा निघाली. आझाद बगीचा येथे जनसंवाद साधण्यात आला. त्यानंतर पदयात्रा पुन्हा मार्गस्थ झाली. कामगार चौक, नेहरू स्कुल घुटकाला येथे सभेनंतर समारोप झाला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाषजी धोटे यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेतून पक्षाच्या धोरणांविषयी जनतेला माहिती देण्यात येईल. तसेच, जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेच्या सोबत आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाने कोणतीही कसर सोडणार नाही. आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की, काँग्रेस पक्ष जनतेचा पक्ष आहे. पक्षाच्या धोरणांमुळे देशात विकास झाला आहे. सध्याच्या मोदी सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी ही पदयात्रा आहे.
चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामु) तिवारी यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या यात्रेमुळे चंद्रपूरच्या जनतेशी पक्षाचा जवळचा संपर्क निर्माण होईल. आपण सर्वांनी एकत्रित येऊन चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन करायचे आहे. यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे, असे आवाहन केले.
या जनसंवाद यात्रेत महिला काँग्रेस, युथ काँग्रेस, एनएसयुआय, ओबीसी विभाग, अनुसूचित विभाग, अल्पसंख्यांक विभाग, इंटक, प्रोफेशनल काँग्रेस, पर्यावरण विभाग व इतर सर्व विभागाचे पदाधिकारी, चंद्रपूर शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
५ सप्टेंबरला गांधी चौकात जाहीर सभा
आजपासून सुरू झालेली ही यात्रा १२ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. ५ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता तुकुम प्रभागातील मातोश्री विद्यालय येथून सुरू होणाऱ्या यात्रेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होणार आहेत. यावेळी ते चंद्रपुरातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता गांधी चौकात जाहीर सभा होणार आहे. यावेळी काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.