डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे
गडचिरोली, दि.26: डेंग्यु आजाराबाबत लोकांनी घाबरुन न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजनेसोबत योग्य आहार, आराम व स्वच्छता तसेच वेळीच औषधोपचार या त्रिसुत्रीचा वापर केल्यास निश्चितच डेंग्यु या आजारावर मात करता येवू शकतो. पावसाळयाच्या दिवसात डेंग्युची लागण व प्रसार रोखण्यासाठी सर्वांनीच दक्ष राहण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी केले आहे.
डेंग्यु हा किटकजन्य आजार असुन तो विषाणु पासुन पसरत असतो. डेंग्यु या आजाराचा प्रसार एडिस ईजिप्ती या डासापासुन होत असतो. हा डास प्रामुख्याने दिवसा चावत असतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असते. त्यामुळे आपल्या घरातील कुंडया, कुलर, रिकामे टायर ,फ्रिजच्या मागे, घरावरील छतावर पाणी 7 दिवसापेक्षा जास्त पाणी साचणार नाही याबाबत सर्वानी दक्षता घ्यावी. आरोग्य विभागामार्फत डेंग्यु या आजाराच्या प्रतिबंधासाठी गावागावामध्ये ताप सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात येत आहे. तसेच किटकजन्य सर्वेक्षणामध्ये घरातील दुषित कंटेनर शोधुन ते रिकामे केल्या जात आहे. तसेच तापच्या रुग्णावर वेळीच उपचार करुन गंभीर आजाराच्या रुग्णांना वेळीच संदर्भ सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. पंचायत विभाग मार्फत ग्रामपंचायती द्वारा धुर फवारणी, पिण्याचे पाण्याचे निर्जतुकीकरण , केल्या जात आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह हे वेळोवेळी सर्व विभागाच्या विभाग प्रमुखाची व्हि.सी.द्वारा आढावा घेवुन पावसाळयाचे दिवस असल्याने प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्या याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. आरोग्य विभागासोबत ईतर विभागांनी समन्वय साधुन जिल्हयातील डेंग्यु मलेरीया या आजारावर नियंत्रणा करिता प्रयत्न करावे, अशा सुचना देण्यात आल्या आहे. नुकतेच त्यांनी सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केन्द्र , मोयाबीन पेठा येथे भेट देवुन आरोग्य विषयक बाबीचा आढावा घेतला.
आजाराची लक्षणे – एकाएकी ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डौळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, सर्वांग दुखणे, अंगावर पुरळ येणे, पोट दुखणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, प्रसंगी उलट्यातून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, नाकातोंडातून हिरडयातून रक्त स्त्राव होणे, रक्त मिश्रीत काळसर संडास होणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत.
वरील डेंग्युबाबत लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत रक्त तपासणी करावी आणि औषधोपचार घ्यावे. तसेच आजाराला टाळण्याकरिता नागरिकांनी आठवडयातून एकदा कोरडा दिवस पाळावा. दर आठवडयाला घरातील पाण्याची भांडी रिकामे करुन स्वच्छ घासुन, पुसुन कोरडी करावी , जुने टायर, नारळाचे टरफल, प्लास्टीकच्या वस्तु, पाणी साचु शकेल अशा फुटलेल्या बाटल्या अशा निरपयोगी वस्तु घराभोवती साठु देवु नका, घारातील फुलदाण्या, कुलर, फ्रिज यामध्ये साचलेले पाणी दर 2 ते 3 दिवसांनी काढावे, संडासच्या वेन्ट पाईपला जाळी बांधावी, झोपताना मच्छर दाणीचा वापर करावा असे जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.