16 ते 31 ऑगस्ट दरम्यान आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत
लाभार्थी जोडणी पंधरवडा
चंद्रपूर, दि. 24 : केंद्र सरकार पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत लाभार्थी जोडणी पंधरवडा दि. 16 ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नियोजन भवन, येथे कृषी विभाग व आत्मा कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रिती हिरळकर, नाबार्डचे व्यवस्थापक तृणाल फुलझेले, अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, माविमच्या शारदा हुसे, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ गणेश मादेवार, वैनगंगा वॅलीचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, कृषी अधिकारी श्री. भैसारे, बॅंकेचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी गट, कृषी उद्योजक आदींची उपस्थिती होती.
कार्यशाळेमध्ये केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेतंर्गत पात्र प्रकल्प, पात्र लाभार्थी, जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर प्रस्ताव याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. तसेच पात्र लाभार्थींनी अर्ज कसा करावा, कृषी आधारित प्रकल्पावरील घेतलेल्या कर्जावर व्याज सवलत कशी घ्यावी, या विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली. जिल्ह्यात आजपर्यंत कृषी पायाभूत निधी योजनेतंर्गत प्रलंबित प्रस्तावांचा, कृषी पायाभूत निधी योजना-जिल्हास्तरीय समितीमध्ये पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे ठरले.
यावेळी मान्यवरांचे हस्ते कृषी पायाभूत निधी योजना प्रचार प्रसिद्धी साहित्याचे विमोचन करण्यात आले. कार्यशाळेत नाबार्डमार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी विपणन पायाभूत सुविधा तसेच बँकामार्फत कृषी उद्योगाना असलेल्या योजना, सवलती, उपलब्ध कर्ज, याविषयीची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन भास्कर गायकवाड यांनी तर आभार श्री. दातारकर यांनी मानले.