प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार करिता अर्ज आमंत्रित
गडचिरोली,दि.18:केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारसाठी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी करीत असलेल्या बालकांना बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारसाठी वैयक्तीक पुरस्कार व संस्थास्तर पुरस्कार दिला जाणार आहे.
बाल शक्ती पुरस्कार करिता मुलांचे वय ५ ते १८ वयोगटातील असावे, तसेच शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य, शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो
वैयक्तीक पुरस्कारकरीता मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान ७ वर्ष काम करणा-या व्यक्तीस पुरस्कार दिला जाणार आहे.
तसेच संस्था स्तरावर बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणा-या संस्थेला पुरस्कार दिला जाणार आहे. संस्था पूर्ण शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी, व बाल कल्याण क्षेत्रात किमान १० वर्ष सातत्यपूर्ण उत्कृष्टपणे कार्य करणारी असावी.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सादर पुरस्कारांसाठी नामनिर्देशन करावयाच्या मार्गदर्शक सूचना सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे विहित केलेल्या आहेत. सार्वजनिकरित्या खुले नामनिर्देशन ही केवळ संकेतस्थळामार्फतच (www.awards.gov.in) स्वीकारले जाईल संकेतस्थळाव्यतिरिक्त प्राप्त होणारे नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात पुरस्कार देण्याकरिता प्रत्येक वर्षाच्या ३१ आगस्ट पर्यन्त वर्षभर केव्हाही संकेतस्थळामार्फत अर्ज स्वीकारले जातील. विशेष नेपुण्य असणाऱ्या मुलाची शिफारस कोणताही नागरिक संकेतस्थळावर करेल. संकेतस्थळामार्फत विहित मुदतीत प्राप्त होणारे अर्ज राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्हाधिकारी/जिल्हा न्यायाधीश इतर शासन/योग्य संस्था यांना पडताळणी करता पाठविण्यात येतील. वरील प्रकियानंतर अर्जाची छाननी त्यांच्या पात्रतेनुसार करण्यात येईल .
सन २०२४ साठी देण्यात येणा-या पुरस्कारासाठी बालक व संस्थांनी ३१ ऑगस्ट पर्यंत www.awards.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.