शासकीय रुग्णालयातील परिचारिकेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करा
वैद्यकीय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांची मागणी
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने परिचारिका सीमा मेश्राम यांना आपला जीव गमवावा लागला. शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाही, हे उघड आहे. मात्र, त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सला उपचाराअभावी जीव गमवावा लागतो, ही घटना दुर्दैवी असून, निष्काळजीपणा आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली आणि तेलंगणा राज्यातील ग्रामीण भागातील अनेक गरीब आणि गरजू रुग्ण कमी खर्चात उपचार व्हावे, यासाठी येथे भरती होत असतात. मात्र, येथील रुग्णालयात योग्य उपचार सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. सामान्य माणसांना उपचार न मिळणे ही नित्याचीच बाब झाली असताना याच रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला जीव गमवावा लागला, हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा पुरावा आहे. इतरांची काळजी घेण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या एका परिचारिकेला जीव गमवावा लागतो, यासारखी लाजिरवाणी घटना नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयी सुविधांकडे सत्ताधाऱ्याचे लक्ष नाही, पालकमंत्री आढावा घेत नाहीत. वैद्यकीय अधिकारी कोणालाच जुमानत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसांच्या आरोग्याचे हाल होत आहे. रुग्णांची दुर्दशा ही चिंतेची बाब असून, रात्रपाळीत वैद्यकीय अधिकारी का उपलब्ध नव्हते, तज्ञ्ज डॉक्टर कुठे गेले होते, रात्रभर मृत्यूशी झुंज देणाऱ्या परिचारिकेची का तपासणी झाली नाही, या घटनेची आरोग्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.