मोहिमेची होणार प्रभावी अंमलीबजावणी : सर्व शासकीय यंत्रणा कामाला
दिनांक 17 ऑगष्ट ते 31 ऑगष्ट 2023 – 15 दिवस शाळाबाहय बालकांची शोध मोहिम
गडचिरोली,दि.17: शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक 17 ऑगष्ट ते 31 ऑगष्ट 2023 या कालावधीमध्ये घरोघरी जावून, बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजार तळ, विटभट्टया, सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळयात, जंगलात वास्तव्या करणाऱ्या पालकांच्या शाळाबाहय बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्याकरीता शोधमोहिम राबविण्यात येणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम 2009 दि. 1 एप्रिल 2010 रोजी लागू करण्यात आलेला आहे. या कायदयानुसार वय वर्ष 06 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त आहे. यानुसार दिनांक 17 ऑगष्ट ते 31 ऑगष्ट 2023 या कालावधीमध्ये विशेष शोध मोहिम राबवुन 3 ते 18 वयोगटातील शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी जिल्हयाअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांनी समन्वय साधून शाळाबाहय बालकांचा शोध घेतला जाणार आहे.
महाराष्ट्रात बऱ्याच जिल्हयातून मोठया प्रमाणात कुटुंबे आर्थिकस्तर निम्न असलेल्या वंचित घटाकातील भूमिहीन अथवा अल्पभूधारक असतात. यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरीता तेलंगाणा, छत्तीसगड या राज्यात व त्या राज्यातून स्थलांतर करण्याची गरज भासते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. त्यातही मुलींचे प्रमाण जास्त वाढण्याची भिती असते.
रोजगाराची अनिश्चितता, सामाजिक असुरक्षितता व पालकांच्या मनातील भिती यामुळे बालमजुरी व बालविवाहांचे प्रमाण वाढत आहे. अशा स्थलांतरीत बालकांना शिक्षण हक्क अधिनियम 2009 कलम (4) नुसार शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
अशा बालकांचा शोध घेवून शाळाबाहय व अनियमित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, बालकांचे पालकांसोबत होणारे स्थलांतर थांबविणे, स्थलांतरीत बालकांना त्याच परिसरात शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे, स्थलांतरीत होणाऱ्या बालकांना शिक्षण हमी कार्ड देवून त्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरू ठेवणे व बालकांची गळती शुन्यावर आणणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.
वरील मोहीम यशस्वी करण्याकरीता अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांना सुचना देऊन सर्वेक्षण प्रभाविपणे राबविण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत. असे शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.