जिल्हयात रेल्वे आणि विमान सेवा सुरू करण्यासाठी शासनाकडून अंमलबजावणी सुरू -अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

जिल्हयात रेल्वे आणि विमान सेवा सुरू करण्यासाठी शासनाकडून अंमलबजावणी सुरू
-अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयी मंत्री धर्मरावबाबा यांचेहस्ते ध्वजारोहण

गडचिरोली, दि.15: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ध्वजरोहण केले. जिल्हा निर्मितीपासून वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य याबाबत अमुलाग्र बदल झाले आहेत. जिल्हयात दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य व शिक्षण सुविधा अजून चांगल्या प्रकारे कशा देता येतील याबाबत प्रशासन काम करीत आहे असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ध्वजारोहण कार्यक्रमावेळी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे समारोपीय वर्ष आहे. या निमित्ताने ‘मेरी माटी, मेरा देश’ (मिट्टी को नमन, विरों का वंदन) हे अभियान 9 ऑगस्ट पासून संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे. पंचप्रण शपथ घेऊन नुकताच या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे विविध कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
खनीज आणि नैसर्गिक साधनसंपत्ती विपूल प्रमाणात असलेल्या गडचिरोली जिल्ह्याकडे विकासाच्या बाबतीत शासनाचे विशेष लक्ष आहे. यामध्ये आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगार विषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. अर्थव्यवस्था बळकट करून जिल्हयातील युवकांना जिल्हयातच काम मिळवून देणे शासनाचे महत्त्वाचे उद्दीष्ट असणार आहे. जिल्हयातील रोजगार वाढवून जिल्हयातील प्रत्येक नागरिकाला विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी शासन कटीबध्द आहे.
शासनाचा अभिनव उपक्रम असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील 6 लक्ष 97 हजार 613 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या उपक्रमात लोकसंख्येच्या तुलनेत विविध योजनांचा सर्वाधिक लाभ देणारा गडचिरोली हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. भारतमाला राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत गडचिरोली ते दुर्ग हा प्रस्तावित चौपदी रस्ता जिल्ह्यातील 5 तालुके आणि 58 गावांतून जाणार आहे. या रस्त्याची गडचिरोली जिल्ह्यात एकूण लांबी 70.15 किमी आहे.
मौजा सुरजागड येथील लोह खनीजावर आधारीत कोनसरी येथे पोलाद कारखाना उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 95 टन प्रति दिवस असे दोन युनीट 4 मेगावॅट पॉवरचे स्पंच आयर्न प्लाँट स्थापित करण्याची कार्यवाही सुरू आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील 904 गावांकरीता 595 मोबाईल टॉवर मंजूर करण्यात आले आहे. यापैकी 37 मोबाईल टॉवरचे काम पूर्ण झाले असून 145 टॉवरचे काम प्रगतीपथावर आहे.
वडसा –गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाची एकूण लांबी 52.36 किमी आहे. जेएमआर प्रस्तावानुसार या प्रकल्पासाठी एकूण 220.468 हे.आर जमीन प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पाकरीता गडचिरोल व देसाईगंज उपविभागातील एकूण 24 गावातील 132.344 हे.आर खाजगी जमीन प्रस्तावित असून आतापर्यंत 101.390 हे.आर. जमीन थेट खरेदी पध्दतीने संपादन करण्यात आली आहे. सदर जमिनीचा ताबा रेल्वे विभागास देण्यात आला आहे. उर्वरीत खाजगी जमिनीच्या भुसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच गडचिरोली ते वडसा रेल्वेलाईन करीता वन जमिनीच्या 71.72 हे.आर क्षेत्राला केंद्र शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. तर जे.एम. आर. नुसार 16.404 हे. आर जमीन शासकीय असून जमिनीचा ताबा रेल्वे विभागास देण्यात आला आहे.
येथील उद्योगांना चालना देण्यासाठी गडचिरोली येथे विमानतळ प्रस्तावित असून शासन स्तरावरून त्याचा नियमित आढावा घेण्यात येत आहे. गडचिरोल विमानतळाकरीता 3 किमी लांब व 500 मीटर रुंदीच्या धावपट्टीसाठी गडचिरोली तालुक्यातील मौजा मुरखळा, पुलखल व कनेरी येथील एकूण 213.51 हे. आर. खाजगी व शासकीय जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. गडचिरोली येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी चंद्रपूर – गडचिरोली राष्ट्रीय महामार्गालगत जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीला लागून असलेली 20 हे. आर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कृषीपंप वीज जोडणी धोरण अंतर्गत आजपावेतो जिल्ह्यातील 4122 कृषी पंपांना व इतर योजनेंतर्गत 485 कृषी पंपांना विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 28 उपकेंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये 77 मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे.
जिल्हा निर्मितीवेळी दुर्गम भागात चारचाकी वाहन जाणे आवघड होते. मात्र आता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात उभारले गेले आहे. डोंगराळ, अतिदूर्गम व निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रशासनाला विकासात्मक कामे करणे आवघड होते. परंतू जिल्हा प्रशासन त्यावरही मात करून आवश्यक सोयीसुविधा ग्रामीण भागात देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
मोबाईल आणि इंटरनेट नेटवर्क मधेही आता गतीने कामे केली जात आहेत. सर्व तालुक्यात शासकीय कार्यालये इंटरनेटने जोडली गेली आहेत. कनेक्टींग गडचिरोली प्रशासनाचे आजचे मुख्य उद्दीष्ट आहे. गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक युवकाला जिल्हयातच शिक्षण व उद्दोगाच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन गतीने योजना राबवित आहे.
वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य याबाबत जिल्ह्यात अमुलाग्र बदल झाले आहेत. आता जिल्हयात रेल्वे आणि विमान सेवा सुरू करण्यासाठी शासनाकडून अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हयात दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य व शिक्षण सुविधा अजून चांगल्या प्रकारे कशा देता येतील याबाबत प्रशासन काम करीत आहे.
जिल्ह्यात नक्षलवाद कमी होत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना आत्मसन्मानाने जगता यावे व जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्यासाठी आता त्यांच्या पुनर्वसनासाठी भरीव प्रयत्न केले जात आहेत. सोबतच पोलिस विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नागरिकांनी विकासाचा मार्ग अवलंबिला आहे. यात पोलिस दादालोरा खिडकी योजना, प्रोजेक्ट उडाण आणि प्रोजेक्ट उत्थान अशा विविध योजनांद्वारे मागील एका वर्षात 2 लक्ष 34 हजार 919 नागरिकांपर्यंत तर आतापर्यंत एकूण 4 लक्ष 59 हजार 277 लाभार्थ्यांपर्यंत शासन पोहचले आहे.
माझा अन्न व औषधी विभाग हा महत्वाचा विभाग असुन आता वैद्यकीय सुनवानीसाठी मुंबईला जातांना त्रास होतो. हा त्रास नागरिकांना होणार नाही याची आम्ही काळजी घेत असून नागपूर- अमरावती विभाग यांचे नागपूरातच सुनवानी होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात अन्न व औषधी विभागाकरीता स्वतंत्र ईमारत बांधण्याकरीता निधी तसेच मंजूरी झालेली आहे.
हे जनतेचे सरकार असल्यामुळे नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. एकूणच गडचिरोली जिल्हा, विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा. यासाठी मी आपणास सर्वांगीन विकासाची हमी देतो. अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

 

विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव:
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली, उत्कृष्‍ट कार्याबद्दल, उपजिल्हाधिकारी (रोहयो), धनाजी पाटील, तहसिलदार, गडचिरोली महेंद्र गणवीर, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी, शिवशंकर टेभूर्णे, अव्वल कारकून, सुरेंद्रसिंह चव्हाण, महसुल सहाय्यक, महेश इंदुरकर, यावेळी महसूल विभागातील अनुकंपा धारकांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचेकडून जिल्‍हा युवा पुरस्कार सन 2021-22 करीता सुरज प्रभाकर चौधरी देसाईगंज, कु. रश्मी वसंत वाळके, चामोर्शी,
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, गडचिरोली (अमृत महाआवास अभियान पुरस्कार सन 2022-23), जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत- प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामपंचायत दिभना, ता.गडचिरोली, जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत- राज्य पुरस्कृत योजना- ग्रामपंचायत कोरेगाव रांगी, ता. आरमोरी
जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका-प्रधानमंत्री आवास योजना- मुलचेरा, जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका- राज्य पुरस्कृत योजना- मुलचेरा, जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट क्लस्टर-प्रधानमंत्री आवास योजना- मुलचेरा(असीम अमुल्य सरकार),
जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट जिल्हा प्रोग्रामर- राज्य पुरस्कृत योजना/प्रमंआयो- जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, गडचिरोली (नकुल रविंद्र तम्मेवार).
वैद्यकीय व शैक्षणिक कार्यात उल्लेखनिय कामगिरी- अंकुश गांगरेड्डीवार, प्रोग्राम मॅनेजर पॅरिमल फाऊंडेशन,
कृषी विभाग- किशोर घनशाम भैसारे पी.एम. एफ.एम.ई. सन 2023 मध्ये उल्लेखनिय काम, प्रभाकर रघुनाथ कुळमेथे, शेतकरी पिक स्पर्धा विजेते द्वितीय क्रमांक, श्रीमती गीता नेताजी लोंढे शेतकरी पिक स्पर्धा विजेते द्वितीय क्रमांक
तसेच महसुल विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांचे पाल्यास विशेष प्राविण्य प्राप्त झालेल्या पाल्याचे यावेळी सत्कार करण्यात आले.
आभार प्रदर्शन मोहन टिकले, तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांनी मानले.