‘डबल इंजिन’सरकारने धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा!

डबल इंजिनसरकारने धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा!
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांची मागणी

 

मुंबई, १३ ऑगस्ट २०२३

केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार कार्यरत आहे.डबल इंजिनच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात सहभागी झाला आहे.अशात सदैव धनगर आरक्षणासंबंधी सकारात्मक भूमिका घेणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा मुद्दा मार्गी लावावा,असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी रविवारी केले.

महाविकास आघाडीमध्ये असतांना देखील अजित दादांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावणार,असे आश्वासन दिले होते.धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मुद्दयावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यास सरकारची हरकत नाही, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करावे.महाधिवक्त्यांसोबत यासंबंधी बैठक घेत योग्य निर्णय घ्यावा आणि ही जबाबदारी अजित दादांनी स्वीकारावी,असे आवाहन पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीशी धनगर समाज खंबीरपणे उभे राहीला आहे.सत्ता हातून गेल्यानंतर धनगर आरक्षणाच्या मुद्दयावर काही करू शकत नाही,अशी स्पष्ट भूमिका अजितदारांनी घेतली होती.पंरतु,आता ते पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी आरक्षणाच्या मुद्दयावर पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरी राज्य सरकारने आरक्षणासंबंधी सकारात्मक भूमिका घेतली तर हा मुद्दा निकाली निघेल,असे मत देखील पाटील यांनी व्यक्त केले.अजित दादा यांच्यासोबत वारंवार या मुद्दयावर चर्चेसाठी भेट घेतली.धनगर आरक्षणासाठी दादा सकारात्मक आहेत.आता पुन्हा त्यांनी आरक्षणाच्या अनुषंगाने पावले उचलावीत,असे पाटील म्हणाले.