विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनेला चालना व नवउद्योजकांना प्रोत्साहन
Ø महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन
चंद्रपूर,दि. 08 : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” चे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचे अनावरण कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी, नवउद्योजक व त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना शोध घेऊन त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच या नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरविणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील कोणतेही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी/विद्यार्थिनी किंवा जास्तीत जास्त 3 विद्यार्थ्यांचा समूह पात्र असेल तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी व समूहाकडे नाविन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे. हा उपक्रम 3 टप्प्यात आयोजित करण्यात येणार असून प्रथम टप्प्यात राज्यातील महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यानंतर सदर संस्थेतील विद्यार्थी स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंजमध्ये आपल्या नवसंकल्पनांचे अर्ज करू शकतील. संस्थास्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवड प्रथम टप्प्यात करण्यात येईल.
उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या उत्तम दोन संकल्पनांमधून सर्वोत्कृष्ट 100 संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. निवडलेल्या 100 नवउद्योजकांसाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातून सर्वोत्कृष्ट 10 विजेते निवडले जातील. सर्वोत्कृष्ट 10 विजेत्यांमध्ये 30 टक्के महिला, 50 टक्के औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी व वन डिस्ट्रिक वन प्रोडक्ट संबंधित नवसंकल्पनांना प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी रुपये 1 लाख बीज भांडवल देण्यात येणार आहे.
उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील 10 नवउद्योजकांना बारा महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम दिला जाणार असून इन्क्युबेशन प्रोग्रामनंतर 10 नवसंकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण करण्यात येणार आहे. यातून 10 सर्वोत्कृष्ट नवउद्योजकांना प्रत्येकी रु. 5 लाखाचे बीज भांडवल देण्यात येणार आहे. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे, शैक्षणिक संस्था व जिल्ह्यात उपक्रमाची व्याप्ती वाढवून राज्याची नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विशेष पारितोषिकेही दिले जाणार आहेत. उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळ www.msins.in अथवा स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंजेच्या www.schemes.msins.in या पोर्टलला भेट द्यावी.
या उपक्रमात जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.