फळे-भाजीपाला विक्रीकरीता शीतचेंबरच्या सुविधेसह उत्पादक व पुरवठादारांकडून प्रस्ताव आमंत्रित
चंद्रपूर, दि. 08 : महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळामार्फत एकात्मिक फलोत्पादन अभियान योजना राबविण्यात येते. या योजनेमध्ये पणन सुविधेअंतर्गत फळे व भाजीपाला विक्रीकरीता शीत चेंबरच्या सुविधेसह फिरते विक्री केंद्र या घटकास प्रोत्साहन दिले जाते. ग्राहकांच्या सुविधेसाठी लोकवस्तीमध्ये, लोकवस्तीजवळ कमी खर्चाचे फिरते फळे-भाजीपाला विक्री हातगाडी, केंद्र स्थापन करून आवश्यक त्यावेळेस ग्राहकांना फळे व भाजीपाला पुरविणे हा या घटकाचा मुख्य उद्देश आहे.
या घटकांमध्ये कुल चेंबरच्या सुविधेसह हातगाडी, विक्री कट्टा, वजनकाटे आदी भांडवली खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरल्या जातो व प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 15 हजार रुपये अर्थसहाय्य उपलब्ध आहे. या घटकाकरीता सुयोग्य असा रेखांकन आराखडा व अंदाजपत्रक निश्चित करावयाचे आहे. याकरीता इच्छुक उत्पादक व पुरवठादार कंपन्यांकडून फळे व भाजीपाला फिरते विक्री केंद्र शीतचेंबरच्या सुविधेसह याकरीता रेखांकन आराखडा व अंदाजपत्रकाचे प्रस्ताव ऑनलाईन मागविण्यात येत आहे.
प्रस्ताव सादर करण्याकरीता अटी, शर्ती व इतर तपशील कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने, फळे-भाजीपाला फिरते विक्रीकेंद्र शीतचेंबरच्या सुविधेसह या घटकाकरीता उत्पादक व पुरवठादारांनी info@mahanhm.in या ई-मेल आयडीवर प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.