जिल्ह्यात दोन लक्ष 56 हजार  शेतकऱ्यांनी भरला पिक विमा

जिल्ह्यात दोन लक्ष 56 हजार  शेतकऱ्यांनी भरला पिक विमा

भंडारा दि. 4: केवळ एक रुपया पिक विमा देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. या योजनेअंतर्गत काल  3 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील एकूण दोन लाख 56 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.

            31 जुलै ही पिक विमा काढण्याची शेवटची तारीख असताना त्यात काही आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे केंद्र शासनाने ही तारीख वाढवून तीन ऑगस्टपर्यंत केली होती. नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊन पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले होते, ही बाब लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीचे यंदा पहिलेच वर्ष असून यावर्षी या एक रुपयात पिक विमा मिळत असल्याने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करून पिक विमा काढण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सातत्याने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या समन्वयाने सतत आढावा घेऊन याबाबतीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी प्रोत्साहित केले परिणामी जिल्ह्यातील 92 टक्के खातेदार शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे संरक्षण मिळाले आहे.

पिक विमा योजनेत 31 जुलै अखेरपर्यंत एक लक्ष 44 हजार 954 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता . त्यानंतर तीन दिवसाची मुदत वाढ मिळाल्याने 3 ऑगस्ट अखेर 2 लक्ष 56 हजार 192 अर्जदारांनी या पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला आहे .तर गेल्या वर्षी ही संख्या 1 लक्ष 33 हजार 524 एवढी होती. यावर्षी एकंदर 92 टक्के  खातेदार शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेत पीक विमा भरला आहे.यामुळे 124778 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे.

                       कृषी विभाग व अन्य संबंधित यंत्रणांनी केलेल्या कामामुळे आपण यावर्षी 92% पर्यंत चा पर्यंत उद्दिष्ट गाठू शकलो पुढील वर्षी हे उद्दिष्ट शंभर टक्के पर्यंत करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.

-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

जिल्ह्यातील एकूण भूधारकांची संख्या ही 2लक्ष 78 हजार एवढी आहे.