शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकरीता क्रीडा शिक्षकांची आढावा बैठक
चंद्रपूर, दि. 3 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र व चंद्रपूर तालुक्यातील विविध शाळेतील क्रीडा शिक्षकांची बैठक नियोजन सभागृह येथे घेण्यात आली.
या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे डॉ. राकेश तिवारी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त कुंदन नायडू, चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव सुरेश अडपेवार, चंद्रपूर शहर कुस्ती संघटनेचे सचिव धर्मशील कातकर यांच्यासह अंदाजे 100 क्रीडा शिक्षक बैठकीत उपस्थित होते.
शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवून आपली शाळा व जिल्ह्याचे नावलौकिक करावे. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात राज्यस्तर व राष्ट्रीय मैदानी स्पर्धेचे आयोजन होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात विकासात्मक बदल होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण म्हणाल्या की, जिल्ह्यातील सर्व शाळा मुख्याध्यापकांना क्रीडा स्पर्धेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शालेय क्रीडा स्पर्धेत सर्व शाळांनी 100 टक्के सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत खेळाडूंची नोंदणी ऑनलाइन होत असल्याने ऑनलाईन प्रक्रियेबाबत विनोद ठाकरे यांनी उपस्थित सर्व क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले.
बैठकीचे संचालन क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी तर आभार क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके यांनी मानले.